पुण्यात गुन्हेगारी वाढत असतांनाही संमत केलेली ६ नवीन पोलीस ठाणी अद्याप कागदावरच !

पोलीस आणि पोलीसदलातील प्रशासन यांच्या निष्क्रीयतेचे उदाहरण !

पुणे – शहराच्या उपनगरांत गुन्हेगारी वाढत असतांनाच संमत केलेली ६ नवीन पोलीस ठाणी अद्याप कागदावरच आहेत. या ठाण्यांसाठीचा व्यय, मनुष्यबळ संमत न झाल्यामुळे ती चालू होण्यास विलंब होत आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात संमत झालेली तीनपैकी २ पोलीस ठाणी चालू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुण्याच्या नवीन ठाण्यांना गती का मिळत नाही ?, पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे पोलीस आयुक्तालयाकडे दुर्लक्ष होत आहे का ?, असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे.

बाणेर, खराडी, वाघोली, नांदेड सिटी या नवीन पोलीस ठाण्यांना संमती मिळाली आहे. हडपसर आणि लोणी काळभोर या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून काळेपडळ, फुरसुंगी ही नवीन पोलीस ठाणी चालू करण्यास संमती मिळाली आहे. हडपसर परिसरात गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे या ठिकाणी फुरसुंगी आणि काळेपडळ ही पोलीस ठाणी तातडीने चालू होण्याची आवश्यकता आहे.