एस्.एस्.आर्.एफ्.च्या युरोपमधील सूक्ष्म चित्रकर्त्या साधिका सौ. योया सिरियाक वाले यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली जडण-घडण !

सूक्ष्म चित्रांच्या सेवेच्या माध्यमातून एस्.एस्.आर्.एफ्.च्या युरोपमधील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म चित्रकर्त्या साधिका सौ. योया सिरियाक वाले यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली जडण-घडण !

सौ. योया सिरियाक वाले

१. साधिकेला सूक्ष्म चित्रांसंबंधीची सूत्रे परात्पर गुरुदेव स्वतः न सांगता साधिकांच्या माध्यमातून कळवून ‘प्रत्येक साधक हे गुरूंचे रूप आहे’, हे शिकवणे

‘मी सूक्ष्म चित्रे काढण्याची सेवा करत असतांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले कु. प्रियांका लोटलीकर (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म चित्रकर्त्या साधिका) किंवा कु. भाविनी कापडिया (कलेच्या संबंधित सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका) यांच्या माध्यमातून मला सेवेसंबंधी सूत्रे, साधना आणि माझ्यातील स्वभावदोष अन् अहं यांवर मात करण्याविषयी मार्गदर्शन, तसेच ‘सूक्ष्म चित्रांच्या सेवेत माझ्याकडून आणखी काय अपेक्षित आहे ?’ इत्यादी कळवतात. ‘ही सर्व सूत्रे परात्पर गुरुदेव स्वतः मला न सांगता साधिकांना ती सूत्रे मला सांगायला का सांगतात ?’, याचे मला नवल वाटत असे. या संदर्भात चिंतन केल्यावर माझ्या लक्षात आले की, मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूलदेहात अडकले होते. ‘प्रत्येक साधक हे त्यांचे रूप असून या साधकांच्या माध्यमातून देवच मला शिकवत आहे. परात्पर गुरुदेवांच्या स्थूलदेहात न अडकता मला सर्वव्यापी ईश्वराशी अनुसंधान राखता यावे आणि सगुणातून निर्गुणात जाता यावे’, या उद्देशाने परात्पर गुरुदेव असे करत आहेत’, असे मला शिकायला मिळाले.

२. सूक्ष्म चित्रांच्या सेवेच्या माध्यमातून स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करवून घेणे

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्म चित्र पुन्हा काढायला सांगितल्यावर वाईट वाटणे आणि त्यांना प्रार्थना केल्यावर स्वतःच्या मनातील अहंयुक्त विचारांची जाणीव होणे : माझे सूक्ष्म चित्र काढून झाल्यावर साधक ते तपासत आणि परात्पर गुरु डॉक्टरांकडे अंतिम पडताळणीसाठी पाठवत असत. काही वेळा परात्पर गुरुदेव त्या चित्रावर ‘चित्र पुन्हा काढणे’, असे लिहून पाठवत असत. याचा अर्थ मी केलेले सूक्ष्मातील परीक्षण चुकलेले असायचे. हे वाचून मला वाईट वाटत असे. ‘यात नेमके काय चुकले ?’, या विचाराने मी अस्वस्थ होत असे. मनातून मी परात्पर गुरुदेवांना विचारायचे, ‘परम पूज्य, ‘या सेवेत तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ?’, हे तुम्हीच मला दाखवा. ‘या सूक्ष्म चित्रात काय चुकले आहे आणि ते सुधारण्यासाठी मी काय करू ?’, हे मला शिकवा.’ त्या वेळी ‘मी ‘सूक्ष्मातील परीक्षण का चुकले ?’, याचे आत्मपरीक्षण करायला हवे’, असे मला जाणवत असे. तसे केल्यावर मला आतून उत्तर मिळत असे, ‘सेवा करतांना मी पुरेशी प्रार्थना केलेली नसे. माझ्यात शरणागती नसायची. माझ्यात कर्तेपणा असायचा. माझ्या मनात ‘मी काढत असलेले सूक्ष्म चित्र योग्य असेल कि अयोग्य ?’, असा अहंयुक्त विचार असायचा, तसेच ‘मी सेवा चांगली करत नाही’, अशी भीती असायची.’

२ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्म चित्रापेक्षा साधिकेच्या साधनेची अधिक काळजी आहे’, हे लक्षात येणे : यातून माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्म चित्रापेक्षा माझ्या साधनेची अधिक काळजी आहे. माझ्या मनातील भीती आणि अहं न्यून होऊन अन् ईश्वराशी अनुसंधान वाढून माझी आध्यात्मिक प्रगती कशी होईल ?’, यावर त्यांचे लक्ष आहे.’

२ इ. शरणागतभावाने प्रार्थना करून सूक्ष्म चित्र काढणे, ते चित्र साधकांनी तपासल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांकडे पाठवणे आणि तेव्हा ते चित्र योग्य असल्याचे त्यांनी सांगणे : ‘ही सेवा म्हणजे माझ्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रकियाच आहे’, असे मला वाटायचे. ‘ही सेवा ईश्वराला अपेक्षित अशी व्हावी’, यासाठी मी चिंतन करून शरणागतभावाने देवाला प्रार्थना करायचे. त्यानंतर मी ते चित्र काढून साधकांना तपासायला द्यायचे आणि नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे पाठवायचे. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर ते चित्र योग्य असल्याचे सांगत असत.

२ ई. शरणागतभावाने चित्र काढतांना कधी कधी ते दोन किंवा तीन वेळा काढावे लागणे : काही वेळा असे घडले की, मी कर्तेपणा सोडून, देवाला शरण जाऊन, देवावर मन एकाग्र करून, तसेच ‘मी चित्र काढत नसून देवच माझ्या माध्यमातून ही सेवा करवून घेत आहे’, असा भाव ठेवून चित्र काढेपर्यंत मला ते सूक्ष्म चित्र दोन किंवा तीन वेळा काढावे लागायचे.

‘सूक्ष्म चित्रांच्या सेवेच्या माध्यमातून शिकवून परात्पर गुरुदेव माझा कर्तेपणा, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी साहाय्य करत आहेत’, याकरता मला कृतज्ञता वाटत असे.’

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (२४.७.२०१८)

सूक्ष्म चित्र काढतांना साधिका भावाच्या स्तरावर करत असलेले प्रयत्न !

१. ‘सूक्ष्म चित्र काढतांना प्रत्येक वेळी मी देवाशी बोलते आणि देवाला विचारते, ‘हे चित्र आणखी चांगले  होण्यासाठी मी काय करू ?’

२. एखादे सात्त्विक चित्र म्हणजे परात्पर गुरुदेवांचे किंवा एखाद्या देवतेचे चित्र काढायचे असेल, तर ‘टोकदार असलेली पेन्सिल टोचू नये’, या उद्देशाने मी ते चित्र हळूवारपणे काढते. त्या वेळी आतून माझी प्रार्थना होते, ‘हे चित्र खरे वाटू दे आणि या चित्रात सात्त्विकता निर्माण होऊन साधकांना त्याचा लाभ होऊ दे.’

३. कधी कधी मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करून सांगते, ‘तुम्हीच मला चित्राविषयी सूक्ष्मातून दाखवा आणि ईश्वर जसा परिपूर्ण आहे, तसे हे चित्र अधिकाधिक चांगले अन् परिपूर्ण कसे  काढायचे ?’, हे मला शिकवा.’

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (२४.७.२०१८)

स्वयंसूचनांची अभ्याससत्रे करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

१. ‘स्वयंसूचनांची अभ्याससत्रे करतांना ‘स्वयंसूचना म्हणजे ईश्वराचा संकल्पच असून त्यांद्वारे देवाच्या इच्छेनुसार योग्य वेळ आल्यावर माझे स्वभावदोष आणि अहं न्यून होणारच आहेत अन् ते न्यून  होत आहेत’, असे मला जाणवते.

२. काही वेळा ‘स्वयंसूचना म्हणजे ईश्वराला केलेले आत्मनिवेदन असून त्या माध्यमातून आपला भाव वाढून आपण ईश्वराच्या जवळ जात आहोत’, असे मला जाणवते.’

– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (२४.७.२०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक