पणजी, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – भाजप लवकरच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून उतरण्यास सांगून त्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमू शकतात, असा दावा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देहली येथे पत्रकारांशी बोलतांना केला.
सिसोदिया पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासनातील अपयशाची १० प्रमुख सूत्रांची सूची सिद्ध केलेली आहे आणि विधानसभा निवडणूक जवळ आल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे.’’
गोव्याच्या नेतृत्वात पालट करण्यात येणार असल्याचा देहलीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचा दावा खोटा ! सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष
पणजी – देहलीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून उतरण्यास सांगून त्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमणार असल्याचा केलेला दावा खोटा आहे, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘निवडणूक काही मासांवर येऊन ठेपलेली असतांना कुठलाही राजकीय पक्ष नेतृत्वात पालट करू शकत नाही. अशी कृती कदाचित् ‘आप’ करू शकत असेल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भाजपच्या गोव्यातील पक्षनेतृत्वात पालट करणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. देहली येथील पक्षश्रेष्ठींच्या सोबतच्या बैठकीत गोव्यातील नेतृत्वात पालट करण्याविषयी कोणतीच चर्चा झालेली नाही. देहली येथे निवडणुकीच्या सिद्धतेविषयी चर्चा करण्यात आली.’’