सांगोला (जिल्हा सोलापूर) – तालुक्यातील एका युवतीशी ‘लुडो गेम’ खेळत पंजाबमधील तरुण अमनदीप करम सिंग (वय २३ वर्षे) याने मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो ‘व्हॉट्सॲप’, ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांद्वारे तिला ‘व्हिडिओ कॉल’ करू लागला. हे व्हिडिओ कॉल तो ध्वनीमुद्रित करत असे. यानंतर अमनदीप याने हे ‘व्हिडिओ’ संबंधित तरुणीचे नातेवाईक, महाविद्यालयातील गट यांना पाठवले आणि तिची अपकीर्ती केली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर सांगोला पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत या गुन्ह्यातील संशयित आरोपी अमनदीप याला पंजाबमधील त्याच्या गावात जाऊन त्याचा शोध घेऊन अटक केली आहे. अमनदीपवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (आजच्या तरुण पिढीवर सामाजिक माध्यमांची भुरळ आहे; मात्र त्यांचा अनिर्बंध आणि अविचारी वापर यांमुळे नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहेत. याविषयी पालक आणि समाज यांनी सजग होणे आवश्यक आहे. – संपादक)