परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेमुळे दुःखद आयुष्याला कलाटणी मिळून साधनामार्गावर आनंदाने वाटचाल करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या देवद आश्रमातील सौ. जयमाला पडवळ (वय ६६ वर्षे) !

जीवनातील एका कठीण प्रसंगामुळे निराशा आलेली असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद (पनवेल) आश्रमातील सौ. जयमाला पडवळ यांच्या जीवनाला कलाटणी कशी मिळाली ? याविषयी, तसेच त्यांचा पुढील साधनाप्रवास येथे देत आहोत.  

सौ. जयमाला पडवळ

१. विवाहानंतर

१ अ. सासरची माणसे पुष्कळ प्रेमळ असून त्यांनी कशाचीही उणीव भासू न देणे : ‘माझा जन्म झाल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले मला प्रत्येक क्षणाला फुलासारखे सांभाळत आहेत. माझ्या माहेरची परिस्थिती पुष्कळ चांगली होती, असे नव्हते; परंतु माझ्या भावाने माझे लग्न थाटात करून दिले. मला सासरची माणसे चांगली मिळाली. मागच्या जन्मातील माझे भाऊ आणि बहिणी असल्याप्रमाणे दीर अन् जावा, तसेच सासू असे सगळेजण माझ्यावर प्रेम करतात. त्यांनी मला कशाचीही उणीव भासू दिली नाही.

२. पती घर सोडून निघून गेल्याने झालेली मनाची विमनस्क अवस्था !

२ अ. काही वर्षांनी अचानक पतीने काही न सांगता घर सोडून निघून जाणे आणि अथक परिश्रम घेऊनही त्यांचा शोध न लागणे : माझे पती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. आमच्या लग्नाला १० वर्षे होऊनही आम्हाला मूलबाळ नव्हते. १०.३.१९९४ या दिवशी माझे यजमान ‘बहिणीकडे जातो’, असे सांगून शाळेत रजेचा अर्ज देऊन निघून गेले. त्यानंतर ते घरी आले नाहीत. आम्ही त्यांचा सगळीकडे पुष्कळ शोध घेतला; पण त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. मी ‘ते आज येतील, उद्या येतील’ या आशेवरच जगत राहिले. दिवसांमागून दिवस जात होते. पती परत येण्याची आशा पूर्णपणे मावळली होती.

२ आ. ‘आपल्या दुःखाला देवच जबाबदार आहे’, असे वाटून देवाचा राग येणे : मी अशा विमनस्क स्थितीत नोकरी करत होते. तेव्हापासून मला गुरुमाऊलीने आपल्या कृपापंखाखाली मायेने वाढवले. त्यांनी माझ्यावर कृपेची खैरात केली; पण मला अभागीला त्याची जाणीवच नव्हती. मी देवालाच दोष देत होते. पती निघून गेल्यानंतर मी देवाला नमस्कारही करत नव्हते. ‘माझ्या नशिबी आलेल्या दुःखाला देवच जबाबदार आहे’, असे वाटून मला देवाचा राग यायचा. मी सारखी देवालाच दोष द्यायचे. मला अशा स्थितीत वेड लागायचे बाकी होते.

२ इ. पतीचा शोध न लागल्याने मनाने खचून जाणे आणि मनात आत्महत्येचा विचार येणे : पती शोधूनही न सापडल्याने त्या धक्क्याने माझे वडील वारले. त्यामागून १ वर्षाने आई वारली; परंतु आईवडिलांची उणीव माझे भाऊ, भावजया किंवा बहिणी यांनी कधीही जाणवू दिली नाही. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्यावर मायेची पखरण घातली. ते मला माहेरी रहायला बोलवायचे; पण मी त्यांना सासरीच रहाणार असल्याचे समजावून सांगितले. हळूहळू ‘आता जगणेच नको. या जगातील आपला प्रवास कायमचा संपवायचा’, असा विचार माझ्या मनात दृढ झाला. मनातील या नकारात्मक विचाराने माझ्या मनावर विजय मिळवला आणि एके दिवशी ‘आज या घरात परत यायचे नाही’, असे मी ठामपणे मनात ठरवले.

२ ई. आत्महत्येचा विचार प्रबळ झाल्यावर तशी सिद्धता करणे : मी आत्महत्येची पूर्ण सिद्धता केली. मी माझ्या साड्या आणि कपडे कपाटात ठेवले. दागिने अधिकोषात ठेवून वारस म्हणून सासूबाईंचेच नाव लावले. सगळी सिद्धता केली. माझ्या मृत्यूनंतर पुढे पोलीस तपासात अडचण येऊ नये, यासाठी मी ‘माझ्या मृत्यूचे दायित्व माझे आहे’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम दर्शन

३ अ. कामावरून सुटल्यावर सावंतवाडीला येऊन ‘तेथील मोती तलावात जीव द्यायचा’, असे ठरवणे, नदीच्या काठावर बसून काळोख होण्याची वाट पहाणे आणि त्याच वेळी जवळच परात्पर गुरु डॉ. आठवले ‘साधना’ या विषयावर जाहीर सभेत बोलतांना दिसणे : त्या दिवशी मी कामावरून घरी गेले नाही. माझा आत्महत्येचा विचार ठाम होता. मी सावंतवाडी गाठली. सावंतवाडीच्या मोती तलावात जीव द्यायचा’, असा मी निश्चय केला. तेव्हा संध्याकाळचे ६ वाजले होते. मी नदीच्या काठावर बसून रडत होते आणि काळोख होण्याची वाट पहात होते. काळोख झाल्यावर जीव देण्याचे मी ठरवले होते. तो दिवस होता ७.४.१९९७. त्याच दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे (त्यांचे नाव मला नंतर कळले.) सावंतवाडी येथे जवळच असलेल्या कळूसकर हायस्कूलमध्ये ‘साधना’ या विषयावर जाहीर प्रवचन होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर यांचे प्रवचन मध्यावर आले होते. मी रडत असतांना मला परात्पर गुरु डॉक्टर हातात माईक (ध्वनीवर्धक) घेऊन बोलतांना दिसत होते.

३ आ. कुणीतरी स्वतःला खेचत असल्याचे जाणवून सभेच्या ठिकाणी येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रथमच पाहूनही आपोआप हात जोडले जाऊन प्रार्थना करणे, त्या वेळी मनातील आत्महत्येचे विचार नष्ट होणे आणि मन स्थिर होऊन प्रवचन ऐकणे : त्या वेळी मला अनोख्या मार्गाकडे कुणीतरी खेचल्यासारखे जाणवत होते. मी उठले, पर्स खांद्याला लावली आणि कळूसकर हायस्कूलच्या दिशेने निघाले. सायंकाळी ७ वाजता मी सभास्थळी पोचले. माझी दृष्टी व्यासपिठावर बसलेल्या व्यक्तीवर पडली. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती ।’ या उक्तीप्रमाणे त्या असामान्य दैवी व्यक्तीला पाहून नकळत माझे हात जोडले गेले. थोड्या वेळाने मी भानावर आले आणि तेथील एका रिकाम्या आसंदीत बसले. तेव्हा माझे शरीर थरथरले आणि माझ्या अंगातून काहीतरी निघून गेल्यासारखे वाटले. मी पुन्हा त्यांना नमस्कार केला आणि माझे सर्व विचार नाहीसे होऊन मी स्थिर होऊन पुढचे प्रवचन ऐकू लागले. त्या वेळी ते (परात्पर गुरु डॉ. आठवले) कुलदेवतेचा नामजप करण्याविषयी सांगून नामजपाचे लाभ सांगत होते. मी लगेचच त्यांनी सांगितलेला कुलदेवतेचा ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा नामजप चालू केला. मी त्यांना प्रार्थना केली, ‘मला क्षमा करा. आज मी आत्महत्या करायला निघाले होते; पण तुम्ही मला अलगद उचलून इथे आणलेत. तुम्ही कोण आहात, मला ठाऊक नाही; पण माझ्यासाठी तर तुम्ही देवच आहात. तुमच्या चरणी मी संपूर्णपणे शरण आले आहे.’

३ इ. प्रवचन ऐकतांना प्रत्येक सूत्र अंतर्मनात जाणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘प्रारब्धाशी संघर्ष करण्याचे बळ द्या’, अशी प्रार्थना करणे : परात्पर गुरु डॉक्टर सांगत असलेले प्रत्येक सूत्र माझ्या कानात एखाद्या बाणाप्रमाणे घुसत होते. प्रत्येक सूत्र मी मला लावून बघत होते. ‘अरे ! माझे हे दुःख तर माझ्या मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे मला भोगावे लागत आहे. मग मी का म्हणून इतरांना आणि स्वतःलाही दोष देत होते ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘माझे हे सर्व विचार तुमच्या चरणांजवळ ठेवा. मला माझ्या प्रारब्धाशी संघर्ष करण्याचे बळ द्या. माझ्या पुढच्या प्रवासात तुम्ही सतत सूक्ष्मातून माझ्यासमवेत रहा.’ सभा संपल्यावर मी पूर्णपणे भानावर आले.

३ ई. सभा संपल्यावर रात्र होऊनही घरी जाण्यासाठी गुरुकृपेने वाहन उपलब्ध होणे आणि घरी पोचल्यावर सासूबाईंची क्षमा मागणे : रात्रीचे ८.३० वाजून गेले होते. ‘सासूबाई माझी वाट बघत असतील. सकाळपासून रडून रडून त्यांनी काहीही खाल्ले नसेल’, या विचाराने माझे डोळे पाणावले. ‘एवढ्या रात्री मी घरी कशी जाऊ ?’, असा विचार करत असतांना ‘सावंतवाडी-दोडामार्ग या मार्गावर जाणार्‍या प्रवाशांसाठी अमुक नंबरचा ट्रक आहे’, अशी उद्घोषणा झाली. गुरुकृपेने मला त्यात जागा मिळून मी घरी गेले. घरी येईपर्यंत मला रात्रीचे १० वाजले होते. घरी सासूबाई वाट बघत होत्या. त्यांनाही ‘मी जिवाचे काही बरेवाईट तर केले नाही ना ?’, असे वाटत होते; कारण माझी अस्वस्थता त्यांनाही जाणवली होती. शेजारची माणसे त्यांची समजूत घालत होती. मी सासूबाईंच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला आणि त्यांची क्षमा मागितली. ‘‘आई, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला’’, असे म्हणून मी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाले, ‘‘आई, आता मला ‘माझे पती बेपत्ता आहेत’, याचे दु:ख नाही; कारण मी मागच्या जन्मी केलेल्या पापाचे ते फळ आहे. हे मला त्या सभेत कळून चुकले. यापुढे तुम्हाला त्रास होईल, असे मी चुकूनही वागणार नाही.’’

(क्रमशः)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

– सौ. जयमाला पडवळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१४.११.२०१६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक