तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. तेजल पात्रीकर !

कु. तेजल पात्रीकर

१. निर्मळता

‘तेजलताईचा स्वभाव पुष्कळ निर्मळ आहे.

२. सेवेची तळमळ

ताईला अधूनमधून सर्दीचा त्रास होत असतो; परंतु तरीही ती त्यावर मात करून सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ताई अन्य साधकांना नवनवीन सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देते.

३. विविध सेवा कौशल्याने करणे

‘गुरुदेवांनी काळानुसार सांगितलेले नामजप ध्वनीमुद्रित करणे, विविध ध्वनीचित्रफितींना निवेदन करणे, यज्ञांमध्ये आरती म्हणणे’ इत्यादी विविध सेवा ती पुष्कळ चांगल्या प्रकारे करते.

४. प्रत्येक कृतीतून साधना जगत असणे

‘आपली प्रत्येक कृती साधनेला धरून असायला हवी, प्रत्येक कृतीतून आपली साधनाच व्हावी’, असे ती आम्हाला सांगत असते. ताईसुद्धा ‘प्रत्येक कृतीतून साधना जगत आहे’, असेच वाटते.

कु. मयुरी आगावणे

५. साधकांना साधनेत साहाय्य करणे

ताई माझ्या आईप्रमाणेच सर्व गोष्टी समजावून सांगत असल्याने ती मला आईसारखीच वाटते. माझे काही चुकले असेल, तर प्रेमाने, तसेच रागावूनही सांगून ती मला योग्य मार्ग दाखवते.

६. तिच्याकडून काही चुका झाल्या, तर ती आढाव्यामध्ये चुका सांगून क्षमायाचना करते.

७. एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये विषय चांगला मांडल्याचे सर्व श्रेय गुरुमाऊलींना देणे

एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये एका विषयावर गटचर्चा (पॅनल डिस्कशन) करायची होती. त्या ठिकाणी मोठमोठे कलाकार उपस्थित होते. त्या वेळी ताईने मांडलेला विषय अन्य कलाकारांना पुष्कळ आवडला आणि त्यांनी आपल्या कार्याला पाठिंबा दिला. कार्यक्रम झाल्यावर ताईने त्याचे सर्व श्रेय गुरुमाऊलींना दिले आणि त्यांनी सेवा करवून घेतल्याचे सांगितले.

८. सूक्ष्मातील कळण्याचा अहं नसणे

ताईला सूक्ष्मातील कळते. ‘माझ्या मनात काय चालू आहे ?’, हे तिच्या लक्षात येते. ‘माझा अहं कुठे वाढला आहे ? मला कुठे निराशा आली आहे ?’, हे लक्षात घेऊन त्यानुसार ती मला मार्गदर्शन करते. दौर्‍यावर असतांना ‘कुणाची आध्यात्मिक पातळी चांगली आहे ?’, हे तिला लगेच कळते. त्या संदर्भात विचारल्यावर ‘देवच सांगत आहे’, असे सांगून ती कर्तेपण देवाकडे अर्पण करते.

९. भाव

९ अ. ताईचा आवाज पुष्कळ गोड आहे. ती गाणी म्हणत असतांना तिच्यात गुरूंप्रतीचा भाव जाणवतो, तसेच श्रोत्यांचीही भावजागृती होते.

९ आ. ‘समष्टीचा विचार घेऊन सेवा केल्याने ती अधिक परिपूर्ण होते’, असा भाव असणे : एका कार्यक्रमामध्ये तिला विषय सादर करायचा होता. तिला एकाच वेळी निरनिराळ्या तीन विषयांवर ध्वनी-चित्रफीत (व्हिडिओ) बनवायची होती. त्यासाठी कालावधी अल्प असल्यामुळे सूत्रे गोळा करून विषय सिद्ध करण्यास वेळ लागत होता. ‘गुरुमाऊलीला अपेक्षित अशी सेवा होत नाही’, या विचाराने तिला रडू आले; परंतु तिने हार न मानता समष्टीचे साहाय्य घेऊन ती सेवा पूर्ण केली. ‘समष्टीचा विचार घेऊन सेवा केल्याने ती अधिक परिपूर्ण होते’, असा तिचा भाव आहे.

‘हे गुरुमाऊली, ‘जिच्या हृदयामध्ये तुझे अस्तित्व आहे, अशी तेजलताई आम्हाला दिली’, त्याबद्दल तुमच्या चरणी आम्ही कृतज्ञ आहोत. ‘ताईमधील समष्टी गुण आम्हाला शिकता येऊ दे’, अशी तुमच्या पावन चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मयुरी आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२१)