सांगली, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गोष्टी सुरळीत होत असतांना राज्य परिवहन महामंडळही ‘प्रवाशांच्या सेवे’साठी हे ब्रीदवाक्य घेऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देत आहे. ‘एस्.टी.’ने दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना ४ आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सांगली बसस्थानक येथे सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत आरक्षण केंद्रात या योजनेसाठी ‘पास’ काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी याचा प्रवाशांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन सांगली विभाग नियंत्रण सुनील भोकरे यांनी केले आहे.
१. ४ दिवसांच्या प्रवासासाठी साधी बस ९६५ रुपये, निमआराम १ सहस्र १०५ रुपये, तर ‘शिवशाही’साठी १ सहस्र २०५ रुपये आकारण्यात येतील. ७ दिवसांच्या प्रवासासाठी साधी बस १ सहस्र ६८० रुपये, निमआराम १ सहस्र ९२५ रुपये, आणि शिवशाही २ सहस्र १०५ रुपये आकारण्यात येत आहेत. हा पास काढल्यावर साध्या गाडीसाठी ५ रुपये आणि ‘शिवशाही’साठी १० रुपये देऊन कोणत्याही मार्गावर आरक्षण करता येते.
२. सांगली-कोल्हापूर या मार्गावर प्रत्येक १५ मिनिटाला बस उपलब्ध आहे, तर सांगली-पुणे या मार्गावर पहाटे ५.३० रात्री ११.३० या वेळेत प्रत्येक अर्ध्या घंट्याला शिवशाही उपलब्ध आहे. याचसमवेत प्रत्येक १५ मिनिटाला सोलापूर येथे जाण्यासाठीही गाडी उपलब्ध आहे.
३. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात शहरी अन् ग्रामीण पातळीवर अशा दोन्हीकडे फेर्या वाढवण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाळा येथे जाण्यासाठी त्यांचा लाभ होत आहे.