संगीताच्या माध्यमातून साधना करून संतपद प्राप्त केलेले पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) यांच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग

पू. (पं.) केशव गिंडे

‘गायन, वादन आदी कला ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहेत’, असे हिंदु धर्म सांगतो. पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी बासरीवादन साधना म्हणून करून ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेतली. सध्याच्या रज-तमप्रधान काळात असे घडणे दुर्लभ आहे.

व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिच्या जीवनाचे स्वरूप आणि तिला जन्मतः लाभलेली अनुकूलता यांचा बोध होतो. पू. गिंडेकाकांच्या जन्मकुंडलीचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. सर्वसाधारण माहिती

 

अ. जन्मदिनांक : ५.९.१९४२

आ. जन्मवेळ : पहाटे ३.१० वाजता

इ. जन्मस्थळ : बेळगाव (कर्नाटक)

२. लग्नकुंडली

ग्रहांची राशीगत स्थिती लग्नकुंडलीवरून पाहिली जाते. (बाजूला दिली आहे.)

लग्नकुंडली

३. भावचलित कुंडली

ग्रहांची स्थानगत स्थिती भावचलित कुंडलीवरून पाहिली जाते. (बाजूला दिली आहे.)

 

भावचलित कुंडली

४. ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण

४ अ. कलेची आवड आणि कलेसाठी पूरक वातावरण दर्शवणारा योग : पू. गिंडेकाकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कर्क राशीत आहे. शुक्र ग्रह आणि कर्क रास हे दोन्ही घटक जलतत्त्वाशी संबंधित आहेत. हा योग कलेची आवड आणि कलेसाठी पूरक वातावरण देतो. हा योग असल्यास व्यक्तीचा स्वभाव आनंदी, मनमिळावू आणि सौंदर्यप्रिय असतो.

४ आ. कलेसंबंधी उपजत जाण आणि अंतःप्रेरणा दर्शवणारा योग : पू. गिंडेकाकांच्या कुंडलीत तृतीय या कलेशी संबंधित स्थानात बुध आणि नेपच्यून यांची युती आहे. नेपच्यून ग्रह तृतीय स्थानाच्या मध्य-अंशावर आहे, म्हणजे तो तृतीय स्थानाचे पूर्ण फल देण्यास समर्थ आहे. हा योग उत्तम कल्पनाशक्ती, कलेसंबंधी उपजत जाण आणि अंतःप्रेरणा दर्शवतो.

श्री. राज कर्वे

४ इ. आध्यात्मिक स्तरावरील विचारसरणी दर्शवणारा योग : कुंडलीत चंद्र आणि गुरु हे ग्रह मिथुन राशीत एकत्र आहेत. हा योग सात्त्विकतेची आवड, विवेकबुद्धी आणि शांत स्वभाव यांचा कारक आहे. तसेच हा योग ईश्वराप्रती भाव आणि आध्यात्मिक स्तरावरील विचारसरणी दर्शवतो.

४ ई. पूर्वजन्मांतील साधना आणि पूर्वपुण्याई दर्शवणारा योग : नवम (भाग्य) स्थानाचा स्वामी गुरु ग्रह भावचलित कुंडलीनुसार प्रथम स्थानात आहे. हा पुष्कळ शुभ योग आहे. हा योग प्रवास, पुरस्कार, सन्मान आणि कीर्ती दायक आहे. तसेच हा योग सत्संग, गुरुकृपा आणि उपासना यांचा लाभ देणारा आहे. प्रथम स्थानातील गुरु ग्रह पूर्वजन्मांतील साधना आणि पूर्वपुण्याई यांचा दर्शक आहे.

श्री. यशवंत कणगलेकर

४ उ. संशोधकवृत्ती देणारा योग : लग्नकुंडलीत शनि आणि हर्षल यांची युती आहे. हा योग संशोधकवृत्ती देतो. पू. गिंडेकाकांनी वाद्यातील त्रुटींचा अभ्यास करून अनेक प्रयोगांमधून वाद्यात सुधारणा केल्या आहेत, तसेच अनेक वैशिष्ट्यपूर्ण बासर्‍यांची रचना केली आहे.

४ ऊ. आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक असलेले योग : भावचलित कुंडलीनुसार अष्टम स्थानात केतू आणि द्वादश (बाराव्या) स्थानात शनि हे ग्रह आहेत. शनि आणि केतू हे दोन्ही ग्रह आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत. हा योग आध्यात्मिक उन्नतीसाठी पुष्कळ पूरक असून अलिप्तता, त्याग, तपःश्चर्या आणि समष्टीचा विचार ही वैशिष्ट्ये दर्शवतो. कलेच्या क्षेत्रात यश आणि कीर्ती प्राप्त होऊनही पू. गिंडेकाका प्रसिद्धीपासून अलिप्त आहेत. त्यांचे बासरीवादन ऐकून साधकांना आध्यात्मिक अनुभूती येतात, तसेच साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होण्यास साहाय्य होते. त्यांनी ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करावी ?’, याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

पू. गिंडेकाकांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करण्याची संधी मिळाली, याबद्दल आम्ही गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद) आणि श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१०.२०२१)