राष्ट्रीय अस्मितेचा लवलेशही नसणारी बीसीसीआय विसर्जित करणे आवश्यक !
‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला होणारा क्रिकेट सामना रहित करण्याची मागणी भारतातील राष्ट्रप्रेमींकडून होत आहे. मागील काही दिवसांत काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांच्या कारवाया वाढल्याच्या पार्श्वभूमीवर या मागणीने जोर धरला आहे. मागणीत चुकीचे असे काहीच नाही. जो देश भारताच्या मुळावर उठला आहे, त्याच्याशी क्रिकेटचे सामने का म्हणून खेळायचे ? मात्र क्रिकेट सामन्यांद्वारे खोर्याने पैसे ओढणार्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआयला) हे मान्य नाही. ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने नेमून दिलेल्या नियमांनुसार असे नियोजित सामन्यात खेळण्यास नाकारणे चुकीचे आहे’, असे बीसीसीआयने सांगितले आहे. जेव्हा स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो, त्या वेळी बीसीसीआयला नियम आणि वचन यांची आठवण होते. अलीकडेच सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांच्या क्रिकेट संघांनी पाकचा दौरा रहित केला. हा दौरा पूर्वी ठरलेला होता; मात्र त्यांनी तो रहित केला आणि स्वतःच्या निर्णयावर ते ठाम राहिले. क्रिकेटचे सामने किंवा दौरे हे ‘नियोजित’च असतात; मात्र वचन किंवा नियम यांपेक्षा राष्ट्रीय अस्मिता केव्हाही महत्त्वाची. त्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट नाकारण्याचा बाणेदारपणा बीसीसीआयमध्ये दिसून येत नाही. बीसीसीआयला असे करणे सहज शक्य होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर बीसीसीआयचा दबदबा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला बीसीसीआय मोठ्या प्रमाणात निधी पुरवते. भारताने ते देणे थांबवल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड डबघाईला येईल’, असे विधान पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी केले होते. त्यांनी हे विधान टीकात्मक केले असले, तरी त्यात तथ्य आहे. बीसीसीआयने मनात आणले, तर तो पाकशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेऊ शकतो; मात्र आर्थिक लाभाच्या मोहापायी बीसीसीआय असा निर्णय घेण्यास टाळत आहे.
बीसीसीआय जर अशा प्रकारे नियमांची कारणे देत असेल, तर भारत सरकारने त्यात थेट हस्तक्षेप करून सामना रहित करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. असे काही न झाल्यामुळे राष्ट्रप्रेमी दुखावले आहेत. एका बाजूला भारतीय सैनिक प्राणपणाने सीमेवर पाकपुरस्कृत आतंकवादी, तसेच पाक सैनिक यांच्याशी लढतात; मात्र भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानच्या संघाशी क्रिकेट खेळतात, हा विरोधाभास आहे. हा विरोधाभास दूर करून ‘आम्ही आमच्या सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे असून पाकिस्तानशी कुठल्याच प्रकारचे संबंध ठेवणार नाही’, हे दाखवून देण्याची सुवर्णसंधी भारताला होती; मात्र भारताने ती गमावली. भारतीय क्रिकेट संघ पाकच्या विरोधात सामना जिंकेलही; मात्र सामना रहित करून जो परिणाम साध्य होईल, तो सामना जिंकून मिळणार नाही. बीसीसीआय चालवणार्यांच्या हे लक्षात येत नाही, हे संतापजनक होय !