दीर्घ काळापासून प्रकरणे निकालाच्या प्रतीक्षेत असल्याने समाजात वाढत आहे कटुता !
‘देवाचा खरा भक्त हाच देवस्थानचा मालक असतो’, हे हिंदूंना अभ्यासक्रमातून धर्मशिक्षण दिले असते, तर समजले असते आणि मालकीहक्कावरून वाद झाले नसते !
वाळपई, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – वेळूस येथील श्री रवळनाथ देवस्थानच्या मालकी हक्काचा वाद गेल्या १० वर्षांपासून सत्तरी तालुक्याच्या मामलेदारांसमोर निकालाच्या प्रतीक्षेत आहे. निकालाच्या दिरंगाईमुळे महाजनांच्या गटांतील कटुता वाढून वाद विकोपाला जाऊ लागला आहे. दसरोत्सवाच्या दिवशी वाद विकोपाला गेल्याने प्रशासनाला देऊळ बंद करणे भाग पडले. मामलेदारांनी मालकी हक्काचा वाद आणखी दिरंगाई न करता निकालात काढावा, अशी मागणी भाविकांकडून होऊ लागली आहे.
श्री रवळनाथ देवस्थान हे वाळपईवासियांचे श्रद्धास्थान आहे. प्रतिवर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने कालोत्सव साजरा केला जातो. या कालोत्सवात सर्व धर्मांतील लोक सहभागी होत असतात. १५ ऑक्टोबर या दिवशी दसरोत्सवाच्या दिवशी गावकर आणि गुरव समाज यांच्यामधील वाद विकोपाला गेला. यामुळे मामलेदार दशरथ गावस यांनी पोलीस कुमक घेऊन देवळाला टाळे ठोकले. देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिराला टाळे ठोकण्यात आले आहे आणि या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महाजनांच्या दोन गटांतील हा वाद मागील १० वर्षांपासून चालू आहे. ‘हे प्रकरण प्रलंबित न ठेवता मामलेदारांनी वेळीच निकालात काढले असते, तर आज २ गटांमधील ही कटुता वाढली नसती आणि देऊळही बंद करण्याची पाळी आली नसती. प्रशासन या प्रकरणी १० वर्षे उलटूनही निकाल देऊ शकत नाही हे दुर्दैवी आहे’, अशा प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटू लागल्या आहेत.
मामलेदार कार्यालयात आज बैठक
श्री रवळनाथ देवस्थानातील वाद मिटवण्यासाठी सोमवार, १८ ऑक्टोबर या दिवशी मामलेदार कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. गुरव आणि गावकर या दोन्ही महाजनांना या बैठकीत बोलावण्यात आले आहे. किमान या बैठकीत तरी तोडगा निघून मंदिर खुले करावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. सत्तरी तालुक्यात अनेक देवस्थानांमध्ये असे वाद चालू आहेत. या प्रकरणी संभाव्य धोके लक्षात घेऊन शासनाने सर्वच ठिकाणचे वाद तातडीने निकालात काढावे. यासाठी जलदगतीने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.