सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सनातनचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा (वय ४५ वर्षे) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात राबवण्यात आलेले ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

सनातनच्या ग्रंथाचे मुखपृष्ठ

‘गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १.९.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. मागील लेखात ‘पू. रमानंद गौडा यांना या अभियानाची संकल्पना कशी सुचली ? तळमळीने आणि परिश्रम घेऊन अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे दिले आहे. या लेखात पू. रमानंद गौडा यांनी ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील सेवांचे चिंतन कसे करायचे ?’, याविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.   

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/518018.html

प.पू. गुरुदेवांनी एका ग्रंथात लिहिले आहे, ‘काळानुसार सनातन धर्माच्या ज्ञानाकडे जीव आकर्षित होतात.’ हे अभियान राबवतांना ‘पुष्कळ जण या ज्ञानाकडे आकर्षित होत आहेत’, असे आमच्या लक्षात आले. यावरून आम्हाला प.पू. गुरुदेवांच्या वरील वचनाची प्रचीती आली.

१. ग्रंथ अभियानाचा विषय सर्व साधकांपर्यंत पोचायला हवा !

‘पू. रमानंदअण्णा यांनी सांगितले, ‘प्रसारसेवेच्या अंतर्गत ग्रंथ अभियानाचा विषय सर्व साधकांपर्यंत पोचायला हवा. त्या समवेत ‘धर्मशिक्षणवर्ग, साधना सत्संग, धर्मप्रेमी सत्संग यांमध्ये सहभागी होणारे, तसेच राष्ट्र-धर्मप्रेमी अधिवक्ता, उद्योजक, आधुनिक वैद्य, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कन्नड भाषेतील संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू (प्रोफाईल मेंबर्स),  तसेच आपल्याशी जोडलेला प्रत्येक धर्मप्रेमी’ या सर्वांना आपल्याला ग्रंथांचे आणि ज्ञानशक्ती अभियानाचे महत्त्व अन् ही ज्ञानशक्ती घराघरांत पोचवण्याचे महत्त्व सांगायचे आहे. या अभियानाच्या सेवेत त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’

२. ग्रंथांचे महत्त्व सोप्या पद्धतीने सांगावे !

अ. पॉवर पॉईंटद्वारे (पीपीटीद्वारे, माहिती सादर करण्याची एक संगणकीय पद्धत) ग्रंथांचे महत्त्व सांगणे : पू. रमानंदअण्णा यांनी साधकांना सांगितले, ‘जिज्ञासूंना ग्रंथांचे महत्त्व ‘पॉवर पॉईंट’द्वारे (पीपीटीद्वारे, माहिती सादर करण्याची एक संगणकीय पद्धत) सादरीकरण (Power point presentation) करून सांगू शकतो. अशा प्रकारे ‘आणखी आपण काय काय करू शकतो ?’, असे चिंतन करा.’ त्यांनी प्रसारसेवेचे सुनियोजन करण्यासाठीही दिशा दिली.

आ. ‘व्हॉटसॲप’च्या माध्यमातून ज्ञानशक्ती अभियानाचे प्रसार करणारे चित्र (लोगो) प्रसारित करण्यासाठी डीपी (Display picture) सिद्ध करावा.

इ. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ग्रंथांची ‘पोस्ट’ (प्रसार करण्याची माहिती) पाठवावी, तसेच प्रसिद्धीसेवेच्या दृष्टीने स्थानिक वाहिनीवर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर खालच्या बाजूला वाक्य उजवीकडून डावीकडे जाते (स्क्रोलींग देणे), तशी ओळ पाठवावी.

ई. ग्रंथांचे महत्त्व सांगणार्‍या मुलाखती द्याव्यात, तसेच ‘यू ट्यूब’ वाहिनीवर वेगवेगळ्या ‘बाईटस्’ (लहान मुलाखत किंवा एका व्यक्तीने दिलेली माहिती) पाठवाव्यात.

उ. प्रसिद्धी फलकांवर ग्रंथांची माहिती देणारा मजकूर लिहावा, तसेच आकाशवाणीवरील (रेडिओवर) ‘एफ्.एम्.’ या वाहिनीवर प्रसार करावा आणि वेगवेगळ्या ग्रंथांविषयी प्रसिद्धीपत्रक (‘प्रेस नोट’) बनवावी.

ऊ. प्रत्येक ग्रंथांचे महत्त्व सांगणारे लेख लिहावेत.

त्यांनी साधकांना ‘अशा प्रकारे आणखी काय करू शकतो ?’, याचे चिंतन करण्यास सांगून ही सेवा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने दिशा दिली.

३. सर्वसामान्यांपासून सर्व वर्गांतील लोकांपर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी ग्रंथांचे संच बनवावेत !

ज्ञानशक्ती अभियानात आपल्याला आताच्या काळासाठी अत्यंत उपयुक्त असलेले ‘७५ मोठे ग्रंथ आणि २५ लघुग्रंथ’, असे एकूण १०० ग्रंथ (अभियानासाठी निवडलेले ग्रंथ) लोकांना प्राधान्याने देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ‘समाजातील सर्वसामान्य व्यक्तींनाही ग्रंथ मिळायला हवा’, या दृष्टीनेही विचार करायला हवा. ‘ग्रंथ कुणाला मिळाले नाहीत’, असे व्हायला नको. यासाठी विषयानुसार वेगवेगळे संच बनवू शकतो. सर्वसामान्यांपासून सर्व वर्गांतील लोकांपर्यंत आपल्याला ग्रंथ पोचवायचे आहेत. ‘त्या अनुषंगाने त्यांच्या क्षमतेनुसारही ग्रंथांचे संच बनवू शकतो’, असे पू. रमानंदअण्णा यांनी सांगितले.

४. पूर्ण अभियानाचे नियोजन चांगल्या पद्धतीने व्हायला हवे आणि प्रत्येक साधक सेवेत सहभागी व्हायला हवा !

‘साधक ही सेवा सोप्या पद्धतीने करू शकतील’, हा विचार करून ‘आपण यासाठी काय कार्यपद्धत ठेवायची ? कसे धोरण ठरवायचे ?’, असे चिंतन करून योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे. प्रत्येक साधक सेवेत सहभागी व्हायला हवा. सर्वांनी संपर्क करण्याचे आणि ग्रंथ वितरणाचे ध्येय ठेवावे अन् ‘प्रतिदिन होणार्‍या सेवेचा आढावा आत्मनिवेदन स्वरूपात राज्यस्तरावर यायला येईल’, या दृष्टीने नियोजन करावे. (या चिंतनप्रक्रियेसाठी पू. रमानंदअण्णांनी १ आठवड्याचा कालावधी दिला होता.)

– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कर्नाटक (ऑक्टोबर २०२१)

सेवांचे नियोजन करतांना साधकांना सर्व सूत्रे आपोआप सुचत असून ‘हे ईश्वरी नियोजनानेच होत आहे’, असे लक्षात येणे

पू. रमानंदअण्णांनी ‘अभियानाच्या सेवेची व्याप्ती कशी काढायची ?’, हे सांगून सर्वांना व्याप्ती काढायला सांगितली. त्यांनी प्रत्येक टप्प्यातील प्रत्येक सेवेला योग्य दिशा दिली. त्यामुळे ‘या सेवांचे नियोजन करतांना सर्व सूत्रे आपोआप सुचत आहेत’, असे अनुभवता येऊन ‘हे ईश्वरी नियोजनामुळेच होत आहे’, असे आमच्या लक्षात आले.’

– श्री. काशीनाथ प्रभु, सौ. मंजुळा रमानंद गौडा आणि श्री. विजय रेवणकर, कर्नाटक (ऑक्टोबर २०२१)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/521495.html