सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
‘गुरुकृपेने सनातनचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात १ ते ३०.९.२०२१ या कालावधीत ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले होते. या लेखात ‘पू. रमानंद गौडा यांना या अभियानाची संकल्पना कशी सुचली ? त्यांनी तळमळीने आणि परिश्रम घेऊन या अभियानाचे सुनियोजन कसे केले अन् त्यातून आम्हाला कोणती सूत्रे शिकायला मिळाली ?’, हे दिले आहे.
प.पू. गुरुदेवांनी एका ग्रंथात लिहिले आहे, ‘काळानुसार सनातन धर्माच्या ज्ञानाकडे जीव आकर्षित होतात.’ हे अभियान राबवतांना ‘पुष्कळ जण या ज्ञानाकडे आकर्षित होत आहेत’, असे आमच्या लक्षात आले. यावरून आम्हाला प.पू. गुरुदेवांच्या वरील वचनाची प्रचीती आली. (भाग १)
१. अशी सुचली पू. रमानंद गौडा यांना अभियानाची संकल्पना !
१ अ. ‘साधकांची सेवा कशी वाढेल ?’, असा विचार पू. रमानंद गौडा यांच्या मनात येणे आणि त्यासाठी त्यांच्याकडून गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना होणे : गुरुपौर्णिमेच्या कालावधीत सर्व साधकांनी पुष्कळ उत्साहाने, तळमळीने आणि नियोजनबद्ध सेवा केली होती. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर साधकांचे सेवेच्या दृष्टीने प्रयत्न काही प्रमाणात न्यून झाले होते. त्यांच्याकडून मर्यादित सेवा होत होती. त्यामुळे ‘साधकांची सेवा कशी वाढेल ? त्यांना पुढे कसे घेऊन जायचे ?’, असे विचार पू. रमानंदअण्णांच्या मनामध्ये येत होते आणि त्यासाठी त्यांच्याकडून गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना होत होती.
१ आ. ‘सनातनच्या ग्रंथसंपदेतील ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी ‘ग्रंथ अभियान’ करू शकतो’, असा विचार पू. रमानंद गौडा यांच्या मनात येणे : एकदा पू. अण्णा ध्यानमंदिरात बसले होते. त्या वेळी त्यांच्या मनात सनातनच्या ग्रंथांविषयी पुढील विचार येत होते, ‘सनातनची ग्रंथसंपदा पुष्कळ आहे. तिच्यात अमूल्य ज्ञान आहे. हे ज्ञान समाजातील प्रत्येक जिज्ञासूपर्यंत पोचवण्यासाठी आपण न्यून पडत आहोत. त्यासाठी आपण कसे प्रयत्न करू शकतो ?’
त्यानंतर ‘साधकांची सेवा वाढण्यासाठी आणि सनातनचे ग्रंथ समाजात पोचवण्यासाठी आपण ‘ग्रंथ अभियान’ राबवू शकतो’, असा विचार त्यांच्या मनात आला. नंतर त्यांच्या मनात ‘या ग्रंथ अभियानाचे नियोजन कसे करू शकतो ? त्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा येतात आणि या सेवांचे दायित्व कुणाला द्यायचे ?’, असे सर्व विचार आपोआपच यायला लागले. ते या अभियानाविषयी बोलत असतांना ‘त्यांना हे सर्व विचार प.पू. गुरुदेवच देत आहेत’, असे आम्हाला जाणवत होते.
१ इ. ‘प.पू. गुरुदेवांनी दिलेले ज्ञान हे सनातन धर्माचे ज्ञान आहे; म्हणून या अभियानाचे नाव ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’, असे ठेवूया’, असा विचार पू. अण्णांच्या मनात आला.
२. अभियानाला प्रारंभ करण्यापूर्वी पू. रमानंद गौडा यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन
२ अ. अभियानाची सेवा नियोजनपूर्वक करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! : ज्ञानशक्ती अभियानाला प्रारंभ करण्यापूर्वी कर्नाटक राज्यातील एका सत्संगात साधकांना मार्गदर्शन करतांना पू. रमानंदअण्णा म्हणाले, ‘‘कोणतीही सेवा करतांना तिची पूर्वसिद्धता चांगली असायला हवी. ‘सेवेचे नियोजन लिखित स्वरूपात केले, तर तेथेच ती सेवा ५० टक्के पूर्ण होते’, असे गुरुदेवांनी आपल्याला शिकवले आहे. त्यामुळे अभियानाची सेवा नियोजनपूर्वक करण्यासाठी प्रयत्न करूया.
२ आ. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ! : ‘ज्ञानदान हे अन्नदान, वस्त्रदान आणि विद्यादान यांपेक्षा सर्वश्रेष्ठ दान आहे’, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. अन्नदान एका वेळेपुरते किंवा एका दिवसापुरते असते. वस्त्रदान काही मासांपुरते किंवा एका वर्षापुरते असते, तर विद्यादान हे एका जन्मापुरते मर्यादित असते; परंतु ज्ञानदान जिवाला मोक्षापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
२ इ. ‘सनातन धर्माच्या ज्ञानशक्तीचा प्रसार करून प्रत्येक जिज्ञासूपर्यंत हे अमूल्य ज्ञान पोचवणे’, ही काळानुसार सर्वश्रेष्ठ समष्टी सेवा आहे ! : प.पू. गुरुदेवांनी आपल्याला ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञान दिले आहे. आता ‘समाजात जाऊन सनातन धर्माच्या ज्ञानशक्तीचा प्रसार करून प्रत्येक जिज्ञासूपर्यंत हे अमूल्य ज्ञान पोचवणे’, ही काळानुसार सर्वश्रेष्ठ समष्टी सेवा आहे.’’
त्यानंतर पू. अण्णांनी ‘या अभियानाच्या अंतर्गत ‘प्रसार, सोशल मिडिया, प्रसिद्धी, नियोजन, साधकांमध्ये जागृती करणे’, या सेवा येतात’, असे सांगून ‘ज्ञानशक्ती अभियान राबवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी साधकांना मार्गदर्शन केले.’
– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कर्नाटक (ऑक्टोबर २०२१)
(क्रमशः पुढच्या रविवारी)