महिला कृषी साहाय्यकांशी गैरवर्तन करणार्‍या कृषी पर्यवेक्षकावर कारवाई करा ! – मनसेची कृषी अधिकार्‍यांकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? कृषी अधिकारी त्या पर्यवेक्षकाला पाठीशी घालत आहेत का ? – संपादक

सावंतवाडी – तालुक्यातील महिला कृषी साहाय्यकांशी गैरवर्तन करणार्‍या येथील कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकावर तातडीने कारवाई करा अन्यथा त्या अधिकार्‍याला तालुक्यात थारा दिला जाणार नाही, अशी चेतावणी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे यांना दिली. या वेळी अडसुळे यांनी ‘संबंधित अधिकार्‍याची या प्रकरणी चौकशी चालू असून दोषी आढळल्यास त्यांच्यावर नक्कीच प्रशासकीय कारवाई केली जाईल’, असे आश्वासन दिले. यापूर्वी १ ऑक्टोबरला महिला कर्मचार्‍यांनी सभापती सौ. सावंत यांची भेट घेऊन त्या कृषी पर्यवेक्षकाकडून होणार्‍या त्रासाविषयी माहिती दिली होती, तरीही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. (याविषयी माहिती देऊन १४ दिवस उलटले तरी अद्याप चौकशी का पूर्ण झाली नाही ? – संपादक)