(म्हणे) ‘अरुणाचल प्रदेश भारताचे नाही !’ – चीनचे पुन्हा फुत्कार

  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौर्‍याला चीनचा विरोध

  • अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग ! – भारताचे प्रत्युत्तर

चीनचे तोंड कायमचे बंद करण्यासाठी भारताने आक्रमक होणे आवश्यक ! – संपादक
चीनचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजियान व भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

नवी देहली – अवैधरित्या बनवलेल्या अरुणाचल प्रदेशला आम्ही मान्यता देत नाही. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या राज्याचा दौरा केला. त्याला आम्ही विरोध करतो, अशा शब्दांत चीनचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी नायडू यांच्या दौर्‍याचा विरोध केला. त्यांनी अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा आणि पर्यायाने चीनचा भाग असल्याचा दावा केला आहे. चीनच्या या विरोधाला भारतानेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही चीनच्या अधिकृत प्रवक्त्याद्वारे दिलेले वक्तव्य ऐकले. आम्ही ते मान्य करत नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य घटक आहे. भारतीय नेते कुठल्याही राज्याचा दौरा करू शकतात, तसे नियमितपणे अरुणाचल प्रदेशचा दौराही करतात. भारतीय नेत्याचा भारतातील एका राज्यात दौरा करण्याला चीनने विरोध करणे, हे समजण्यापलीकडचे आहे’, असे भारताने म्हटले आहे.

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांच्याव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता आणि चीनने त्यावेळीही या दौर्‍यांचा विरोध करणारी वक्तव्ये केली होती.