१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीचे मंदिर बांधणे
‘प.पू. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हा साधकांकडून अनेक प्रकारे आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे आणि आम्हा साधकांमध्ये आदिशक्तीविषयी प्रेम अन् भक्ती निर्माण केली आहे. ‘आदिशक्तीची कृपा साधकांना निरंतर मिळत रहावी आणि साधकांना तिची भक्ती करता यावी’, यासाठी गुरुदेवांनी रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीचे मंदिर बांधले आहे. कुठलेही मंदिर शाश्वत नाही; मात्र त्या ठिकाणी असलेला दैवी ऊर्जेचा स्रोत शाश्वत आहे. गुरुदेवांनी त्यांच्या करकमलांनी श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याने त्या मूर्तीमध्ये शक्तीपिठासारखी ऊर्जा निर्माण झाली आहे.
२. आद्यशंकराचार्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे देवीच्या १०८ शक्तीपिठांपैकी एक शक्तीपीठ गोमंतकातील कैवल्यपुरी (कवळे, गोवा) येथे असून ते मंदिर सनातनच्या आश्रमाच्या अगदी निकट असणे
वैशिष्ट्य म्हणजे या पृथ्वीवर आदिशक्तीची केवळ ५१ शक्तिपिठे नसून त्यांची संख्या पुष्कळ आहे. आद्यशंकराचार्यांनी उल्लेख केलेल्या देवीच्या १०८ शक्तीपिठांपैकी गोमंतकातील कैवल्यपुरी येथील श्री शांतादुर्गादेवीचा उल्लेख आहे. हे कैवल्यपुरी, म्हणजे आताचे गोव्यातील कवळे गाव. येथे प्रसिद्ध श्री शांतादुर्गादेवीचे मंदिर आहे. त्या मंदिरापासून अगदी थोड्या अंतरावर रामनाथी येथे सनातन संस्थेचा आश्रम आहे. आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ श्री भवानीदेवीचे मंदिर आहे. श्री शांतादुर्गादेवीप्रमाणे ही श्री भवानीदेवीही उत्तरेकडे पहात आहे. आदिशक्तीचा अखंड ऊर्जास्रोत साधकांसाठी रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवी मंदिराच्या माध्यमातून आणणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आम्ही साधक कोटीशः कृतज्ञ आहोत.
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
अर्थ : सर्व मंगल गोष्टींमधील मांगल्यस्वरूप, पवित्र, सर्व इच्छा साध्य करून देणार्या, सर्वांचे शरणस्थान असलेल्या, त्रिनेत्रधारिणी, हे गौरवर्णी नारायणीदेवी (श्री दुर्गादेवी), मी तुला नमस्कार करतो.’
– श्री. विनायक शानभाग, बेंगळुरू (२६.९.२०२१)