अजूनही खासगी रुग्णालय नियंत्रित दरापेक्षा वाढीव देयके आकारतात, हे गंभीर आहे. रुग्णालयांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम ! – संपादक
पुणे – जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना नियंत्रित दरापेक्षा वाढीव देयके आकारल्याचा दावा एका सर्वेक्षणात केला आहे. ‘कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ आणि ‘जन आरोग्य अभियाना’च्या वतीने जिल्ह्यातील १० तालुक्यांतील १२१ तक्रारदार रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. नवी पेठेतील ‘एस्.एम्. जोशी फाऊंडेशन’ सभागृहात ‘संताप सभे’चे आयोजन केले होते त्यात ही आकडेवारी मांडण्यात आली. राज्यभरात प्रत्येक रुग्णामागे सरासरी १ लाख ८४ सहस्र वाढीव देयकाची रक्कम आकारली होती, तर पुण्यात हीच रक्कम २ लाख २६ सहस्र असल्याचे समितीने म्हटले आहे. सरकारने उपचाराचे दर ठरवूनही खासगी रुग्णालयांनी लूटमार केल्याचे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.
राज्यात २ सहस्र ५७९ रुग्णांचे सर्वेक्षण झाले असून आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचे शुक्ला यांनी सांगितले. देयकांच्या लेखापरीक्षणासाठी आयोग नेमून वाढीव देयकातील रक्कम परत द्यावी, दोषी खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी, विधवा महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना कल्याणकारी योजना लागू कराव्यात अशा अनेक मागण्या असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.