पंजाबमध्ये श्री चिंतपूर्णी देवीविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या शीख संपादकांना अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !

  • संपादकांना अद्याप अटक न केल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

  • संपादकांच्या समर्थनार्थ हिंदुद्वेष्ट्या शीख संघटनांचेही आंदोलन !

  • पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत असल्याने संपादकांवर कारवाई होत नाही. याउलट अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असता, तर कुणी तक्रार न करताच कारवाई करण्यात आली असती, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • हिंदूंच्या देवतेचा अवमान करणार्‍याच्या पाठीशी उभ्या रहाणार्‍या हिंदुद्वेषी शीख संघटना देशद्रोही खलिस्तानवादी आहेत का ? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक
  • शीख पंथाची उत्पत्ती हिंदु धर्मापासून झाली आहे; मात्र स्वातंत्र्यानंतर याविषयी शिखांना शिकवण न दिल्यामुळे ते हिंदु धर्मापासून दुरावले. आता तर ते हिंदु धर्माचा द्वेष करू लागले आहेत. हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
आंदोलन करताना हिंदुत्ववादी संघटना

लुधियाना (पंजाब) – हिंदूंच्या देवतेच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी येथील दैनिक ‘रोजाना पहरेदार’चे संपादक जसपालसिंह हेरा यांच्या विरोधात तक्रार हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली; मात्र पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही. पोलिसांनी धार्मिक भावना दुखावण्यासाठीचे कलम ‘२९५ अ’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला असला, तरी ते हेरा यांना अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे हिंदूंनी निदर्शने केली, तसेच मोर्चा काढून रेल्वे पुलावर धरणे आंदोलनही केले.

१. काही दिवसांपूर्वी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी श्री चिंतपूर्णी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावर ‘रोजाना पहरेदार’चे संपादक हेरा यांनी लिहिलेल्या लेखाच्या मथळ्यामध्ये देवीचा ‘बेगानी देवी’ (अनोळखी असणारी देवी) असा आक्षेपार्ह उल्लेख केला.

२. हिंदूंनी निदर्शने केल्यावर त्यांच्या समर्थनार्थ शीख संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला घेराव घातला. त्यांनी संपादकांच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.