‘श्री अंबाबाई भक्त समिती’चे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निवेदन
कोल्हापूर, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने कायदेशीर नियमावली घालून देण्यात आली आहे. भाविकांना चप्पल काढण्यासाठी मंदिरापासून २०० मीटर अंतरावर चप्पल ‘स्टॅण्ड’ उभे करण्यात आले आहे. यामुळे मंदिर परिसरात कुणालाही पादत्राणे नेण्यास अनुमती नसतांना ८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी मंदिर परिसरातील अतीबल्लेश्वर मंदिरासमोर काही उंची दर्जाचे बूट, चप्पल काढल्याचे दिसून आले. सदर बूट हे ‘व्ही.आय.पी.’ लोकांचे आहेत.
हा प्रकार म्हणजे देवस्थान समितीच्या कायदेशीर नियमावलीचे उल्लंघन असून भाविकांच्या भावनांची खिल्ली उडवणारे आहे. तरी श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात कायदेशीर नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी देवस्थान समितीचे अध्यक्ष यांच्यासह त्यांना साहाय्य करणार्यांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन ‘श्री अंबाबाई भक्त समिती’ आणि ‘पतित पावन संघटना’ यांच्या वतीने जुना राजवाडा येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या वेळी सर्वश्री प्रमोद सावंत, महेश उरसाल, सुनील पाटील उपस्थित होते.