जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिदिन २० सहस्र भाविकांना दर्शन मिळणार !

जेजुरीचे खंडोबा मंदिर

जेजुरी (पुणे), ७ ऑक्टोबर – शासनाच्या आदेशानुसार नियम आणि अटींचे पालन करीत घटस्थापनेपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत जेजुरीचे खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले आहे. प्रतिदिन २० सहस्र भाविकांना देवदर्शनाचा लाभ होणार असल्याचे ‘मार्तंड देव संस्थान’कडून कळवण्यात आले आहे.

भाविकांना दर्शन रांगेतूनच योग्य ते अंतर ठेवत केवळ मुखदर्शन घेता येणार आहे. १० वर्षांखालील मुले-मुली आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, तसेच गर्भवती स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गाभा‍र्‍यात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्याचसमवेत प्रतिदिनचे कुलधर्म, कुलाचाराचे धार्मिक विधी केवळ देवाचे सेवक, पुजारी यांच्याकडून करण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून भाविकांनी स्वत:हून शासकीय नियमांचे पालन करावे. तसेच देव संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी केले आहे.