कॉर्डेलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीचा गोव्याशी संबंध असल्याचे प्रकरण
पणजी, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्याला अमली पदार्थांचे सेवन करणार्या पर्यटकांची आवश्यकता नाही, असे विधान उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी केले आहे. कॉर्डेलिया क्रूझवरील केंद्रीय अमली पदार्थ विभागाच्या धाडीमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांना कह्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड होत आहे. या क्रूझवरील पार्टीचे गोवा हे केंद्रस्थान होते, अशी धक्कादायक माहितीही चौकशीतून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी हे विधान केले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘पर्यटकांनी अमली पदार्थांचे सेवन करू नये, यासाठी गोवा शासन गंभीर आहे. गोवा राज्य हे अमली पदार्थ आणि कचरा यांपासून मुक्त असले पाहिजे.’’ कोरोना महामारीनंतर आता गोव्यात कॅसिनो, चित्रपटांसाठीचे चित्रीकरण आदींना प्रारंभ झालेला असल्याने गोव्यात देशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत.
गोवा शासन ‘म्युझिकल फेस्टीव्हल’ला अनुमती देणार ! – मनोहर आजगावकर, उपमुख्यमंत्री
पणजी – गोवा शासन ‘म्युझिकल फेस्टीव्हल’ला (पाश्चात्त्य संगीत उत्सवाला) अनुमती देणार आहे; मात्र त्यांना कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार आहे, तसेच शासन देणार असलेली अनुमती ही कार्यक्रम होणार त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. गोवा शासन पर्यटनाला नवीन दिशा देणार आहे. गोव्यात ‘पर्यटनासाठी आल्यावर खूप खर्च करू शकतील’, अशा पर्यटकांची अधिक आवश्यकता आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या पर्यटकांना राज्यात प्रवेश देता येणार आहे, असे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी म्हटले. ‘सनबर्न’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हल’च्या (‘ई.डी.एम्.’च्या)आयोजकांनी गोव्यात डिसेंबर मासात ‘ई.डी.एम्.’चे आयोजन करण्यास इच्छुक असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे.
गोव्यात अमली पदार्थांचा व्यवसाय फोफावण्यास उपमुख्यमंत्री आजगावकर काही अंशी उत्तरदायी ! – सागरिका शोना सुमन, मॉडेल आणि अभिनेत्री
पणजी – गोव्यात अमली पदार्थांचा व्यवसाय फोफावण्यास उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर काही अंशी उत्तरदायी आहेत, असा गंभीर आरोप मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका शोना सुमन यांनी केला आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी गोव्याला अमली पदार्थांचे सेवन करणार्या पर्यटकांची आवश्यकता नसल्याचे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सागरिका शोना सुमन यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलतांना हा आरोप केला.
अभिनेत्री सागरिका शोना सुमन पुढे म्हणाल्या, ‘‘मंत्री आजगावकर यांनी अमली पदार्थांच्या विरोधात कोणतीही कारवाई न केल्याने गोवा राज्य हे अमली पदार्थ व्यवसायाचे प्रमुख ठिकाण बनले आहे. गोव्यात अनेक राजकारण्यांचे अमली पदार्थ व्यावसायिकांशी संबंध आहेत; मात्र कोणत्याही राजकारण्याचे नाव मी घेणार नाही; कारण याविषयी प्रत्येक गोमंतकियाला ठाऊक आहे.’’