सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यानंतर जीवनात आमूलाग्र पालट अनुभवलेले  श्री. भीमराव माने (बुवा) (वय ६६ वर्षे) !

श्री. भीमराव माने

१. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी श्री. भीमराव माने (बुवा) यांची स्थिती

१ अ. लहानपणापासून होत असलेला पोटदुखीचा त्रास : ‘माझ्या यजमानांना वयाच्या दहाव्या वर्षापासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्यांना दिवसातून किमान २५ वेळा शौचास जावे लागे. त्यांना तांदूळ आणि मूगडाळ यांपासून केलेली खिचडीही पचत नसे.

१ आ. यजमान घरी आल्यावर आनंद होण्याऐवजी भीती वाटणे : यजमान कामानिमित्त बाहेरगावी असायचे. ते सप्ताहातून एकदा घरी येत असत. मला ते घरी आल्याचा आनंद होण्याऐवजी भीती वाटून माझ्या छातीत धडधडायचे. त्यांनी दारात पादत्राणे काढल्यावर ते लगेच ओरडायचे आणि आमच्यातील भांडणाला प्रारंभ व्हायचा.

सौ. विजया माने

१ इ. मुलांशी आणि सुनेशीही भांडत असल्यामुळे तिला शारीरिक त्रास चालू होणे : मला मूल झाल्यावरही सुख मिळाले नाही. ते मुलाला मारायचे. मुले मोठी झाली, त्यांची लग्ने झाली, तरी माझा त्रास न्यून झाला नाही. ते सुनेशीही भांडायचे. त्यामुळे सुनेला डोके दुखणे, पायांत गोळे येणे, पोटात दुखणे, कंबर दुखणे, काम करायला नको वाटणे, असे त्रास होऊ लागले. घरातील या सर्व त्रासांमुळे गेली १७ – १८ वर्षे मला शांत झोप लागली नाही. मुलगा आणि मुलगी यांचे तरुण वयातच निधन झाले.

आयुष्यभर यजमानांनी माझा छळच केला. या त्रासावर मात व्हावी; म्हणून मी देवाचे पुष्कळ केले. मी पंढरपूरच्या वार्‍या केल्या आणि गोंदवले येथेही गेले. एवढे करूनही घरात काही पालट होत नव्हता.’

– सौ. विजया माने (श्री. भीमराव माने यांच्या पत्नी), कौलगे, तासगाव, जि. सांगली. (२९.११.२०१७)

२. श्री. माने यांच्याविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे

२ अ. सनातनच्या धर्मशिक्षणवर्गात जाऊ लागल्याने कुलदेवता आणि दत्त यांची उपासना करणे : ‘दीड वर्षापूर्वी कौलगे (जिल्हा सांगली) गावात धर्मशिक्षणवर्ग चालू झाला. तेव्हापासून श्री. भीमराव माने (बुवा) कुलदेवता आणि दत्त यांची उपासना करू लागले. ते नियमित नामजप करू लागले. त्यांना धर्मशिक्षणवर्गात येण्याची ओढ वाटू लागली.

कु. सविता खेराडकर

२ आ. व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची तळमळ वाढणे : गावात हिंदु धर्मजागृती सभा घेण्याचे ठरल्यावर बुवा प्रसारसेवेत सहभागी झाले. त्या वेळी बुवांच्या घरी गेल्यावर घरातील सर्व जण दुःखी आणि निराशेत असल्याचे समजले.

गावात हिंदु धर्मजागृती सभा झाल्यानंतर बुवांची व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याची तळमळ वाढली. ते गावात सात्त्विक उत्पादनांचे वितरण करू लागले आणि लोकांना नामसाधना सांगू लागले.’ – कु. सविता खेराडकर, तासगाव, जि. सांगली.

३. श्री. भीमराव माने यांची साधनेपूर्वीची आणि साधनेनंतरची स्थिती

३ अ. असह्य पाठदुखीचा त्रास होणे; मात्र तपासणीत काहीही दोष न आढळणे, पाठदुखीच्या त्रासामुळे काम न्यून होत असल्यामुळे मालकाकडून अवहेलना सोसावी लागणे : ‘मला होणार्‍या पाठदुखीच्या त्रासाचे निदान व्हावे, यासाठी ‘सिटी स्कॅन’ आणि ‘एम्.आर.आय्.’ही केले; परंतु त्यात काही आढळले नाही. माझा पाठदुखीचा त्रास इतका तीव्र झाला की, ‘जीव गेला, तर बरे होईल; पण वेदना नकोत’, असा विचार मनात येऊन मला रात्रभर झोप लागायची नाही. त्यामुळे दिवसभर थकवा असायचा. मुलगा तरुण वयात गेल्यामुळे माझ्यावर सून आणि नातू यांचे दायित्व आले. मला उतारवयातही प्रतिदिन गवंड्याच्या हाताखाली काम करायला जावे लागे. मला होत असलेल्या त्रासामुळे कामावर गेल्यावर इतरांपेक्षा माझे काम न्यून व्हायचे. त्यामुळे कामगार, गवंडी आणि मालक माझी अवहेलना करायचे. ते मला वाटेल, तसे बोलायचे.

३ आ. रामनाथी आश्रमात गेल्यावर पाठ न दुखणे आणि ‘संतांचा सत्संग लाभल्याने जीवनाला कलाटणी मिळाली’, असे वाटणे

धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांचे रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन झाले. आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यावर ३ दिवस माझी पाठ दुखली नाही आणि मला कसलाच त्रासही झाला नाही. ही माझ्यासाठी फार मोठी अनुभूती होती.

‘आम्हाला संतांचा सत्संग लाभावा’, अशी आम्हा सर्वांची तीव्र इच्छा होती. आम्ही सर्व जण त्यासाठी तळमळीने प्रार्थना करत होतो. त्यानंतर आम्हाला संतांच्या सत्संगात बसायला मिळाले आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.

मला ऐकायला न्यून येते, तरी मला संतांनी सांगितलेले सर्व समजत होते. ते मला म्हणाले, ‘‘जे समजले नाही, ते इतरांकडून समजून घ्या’’; पण मला ते सर्व चैतन्याच्या स्तरावर समजल्याचे जाणवत होते.

३ इ. आश्रमातून घरी आल्यावर पुन्हा पाठदुखी चालू होणे आणि नियमितपणे नामजप अन् आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर पाठदुखीचा त्रास दूर होणे : रामनाथी आश्रमातून घरी आल्यावर मला पुन्हा पाठदुखीचा त्रास चालू झाला. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘हा त्रास आध्यात्मिक आहे.’ सहसाधकांनी सांगितल्यानुसार मी गोमूत्र आणि त्रिफळा चूर्ण घेऊ लागलो. मी अत्तर, कापूर आणि मीठ-पाण्याचे उपाय (मिठाच्या पाण्यात पाय बुडवून करायचे उपाय) अन् प्रतिदिन ४ घंटे बसून नामजप करू लागलो. मी पहाटे साडेपाच वाजता उठून एक घंटा आणि दिवसभर कामाला जाऊन रात्री घरातील सर्व जण झोपल्यावर रात्री १० ते १ या वेळेत मी नामजप करतो. गेल्या ६ मासांपासून मी नामजप आणि उपाय नियमितपणे करत आहे.

आध्यात्मिक स्तरावरील उपाय होण्यासाठी घरात ठिकठिकाणी ठेवलेले खोके आणि माझ्या पाठीला दुखण्याच्या ठिकाणी लावलेले खोके पाहून कुटुंबीय मला हसू लागले. नातू मला म्हणाला, ‘‘आमचे आजोबा वेडे झाले आहेत.’’ उपाय केल्यानंतर माझा पाठदुखीचा त्रास हळूहळू न्यून होऊ लागला आणि गेल्या अडीच मासांपासून मला काही त्रास झाला नाही.

३ ई. अनुभूती : आता नामजप चालू झाल्यावर माझे मन भरून येते. प्रतिदिन ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासमोर बसले आहेत आणि त्यांच्या ठिकाणी ब्रह्म आहे’, अशी अनुभूती मला येत आहे. भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांना प्रार्थना करतांना माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात.

३ उ. स्वतःमध्ये जाणवलेले पालट

३ उ १. कुणाशीही भांडण न होणे : गेल्या अडीच ते तीन मासांपासून मी घरात एकदाही शिवी दिली नाही आणि माझे कुणाशीही भांडण झाले नाही. आता मी तरुण मुलांएवढे काम करू शकतो. त्यामुळे कामगार, गवंडी आणि मालक यांच्याकडून माझी होणारी अवहेलना पूर्ण बंद झाली आहे. मी काम करतांना नामजप करतो.

३ उ २. पत्नी, सून आणि नातू साधना करू लागणे : माझ्यात झालेले पालट पाहून मागील दोन मासांपासून माझी पत्नीही नियमितपणे धर्मशिक्षणवर्गाला येते. तीही आता साधना करते. तिला आता शांत झोप लागते. सूनही साधना करू लागली आहे. तिचे डोकेदुखी आणि कंबरदुखी हे त्रास दूर झाले आहेत. तिची निराशा जाऊन उत्साह आला आहे. नातूही आता दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतो.’  – श्री. भीमराव माने, कौलगे, तासगाव, जि. सांगली.

४. घरात जाणवलेले पालट

श्री. सचिन कुलकर्णी

४ अ. खर्‍या अर्थाने सुख, समाधान आणि आनंद मिळणे अन् घरातील व्यक्तींमध्ये झालेले पालट पाहून शेजार्‍यांनी नामजप करणे : ‘आम्हाला आता खर्‍या अर्थाने सुख, समाधान आणि आनंद मिळत आहे. आजपर्यंत आमची घरातील भांडणे पाहून शेजारचे लोक आमच्यापासून दूर होते; पण आता घरातील व्यक्तींमध्ये झालेले पालट पाहून शेजारी रहाणारे लोक साधनेविषयी विचारून नामजप करत आहेत. त्यांना धर्मशिक्षणवर्गात यायचे आहे. आता ‘सर्वांना साधना सांगून सर्व जण सुखी आणि आनंदी व्हावेत’, असे विचार मनात येतात. त्यानुसार सेवा चालू केली आहे.’ – सौ. विजया माने, कौलगे, तासगाव, जि. सांगली.

 ५. श्री. सचिन कुलकर्णी यांना बुवांमध्ये जाणवलेले पालट

‘बुवा प्रत्येक सेवा एकाग्रतेने, शिकण्याच्या स्थितीत राहून आणि भावपूर्णरित्या करतात. ते वयाने मोठे असूनही साधकांशी नम्रतेने वागतात.’ – श्री. सचिन कुलकर्णी, बलगवडे, तासगाव, जि. सांगली.

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २९.११.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक