केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई !
अमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी का अडकत आहे, हे पोलिसांनी शोधावे ! – संपादक
मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ३ ऑक्टोबरच्या पहाटे धाड टाकून ज्या ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरून अमली पदार्थ कह्यात घेतले होते, त्याच ‘क्रूझ’ची ४ ऑक्टोबरला पुन्हा झडती घेण्यात आली. या वेळी ‘क्रूझ’वर अमली पदार्थांचा साठा सापडला असून आणखी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबरला याच ‘क्रूझ’वर ‘रेव्ह पार्टी’ करणारा अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यनसह अन्य ८ जणांना केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती.
३ ऑक्टोबरला पहाटे ‘क्रूझ’वर टाकलेल्या धाडीनंतर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी धाडी टाकून अमली पदार्थांचा पुरवठा करणार्यांना कह्यात घेतले आहे. यातून अमली पदार्थ पुरवठादारांची साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.