गरबा आणि दांडिया यांच्या आयोजनावर बंदी
मुंबई – राज्य सरकारने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा आणि दांडिया यांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. तसेच देवीच्या मूर्तीची उंची आणि मंडपाचा आकार यांवरही निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक मंडळातील देवीची मूर्ती चार फूट, तर घरगुती स्तरावरील देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक आहे. नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
१. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयीचे उपक्रम/ शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे.
२. मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वअनुमती घेणे बंधनकारक आहे.
३. वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास तिचा स्वीकार करावा.
४. विज्ञापनाच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची व्यवस्था करावी. आरोग्यविषयीचे सामाजिक संदेश असलेली विज्ञापने प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेविषयी जनजागृती करावी.