पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – आरोग्य खात्याकडून लवकरच ‘टेली मेडिसीन’ सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. या अंतर्गत रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दूरभाष केल्यावर उपचारांविषयी सल्ला देण्यात येणार आहे. रुग्णालयात येणार्या रुग्णांची संख्या अल्प करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. रायबंदर येथे सुसज्ज अशा आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार बाबूश मोन्सेरात आदींची उपस्थिती होती. रायबंदर येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय, दंतचिकित्सा आणि हृदयासंबंधी उपचार, तसेच ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा उपलब्ध असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे दिली.