उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसेत भाजपच्या ४ कार्यकर्त्यांसह ८ जण ठार !

  • ४ शेतकरी यांचाही मृत्यू !

  • केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर शेतकऱ्यांच्या हत्येचे आरोप !

  • भाजपने सर्व आरोप फेटाळून लावले !

आगीच्या हवाले करण्यात आलेले वाहन

नवी देहली – उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी झालेल्या एका हिंसक घटनेमध्ये भाजपच्या ४ कार्यकर्त्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा हे जिल्ह्यातील तिकुनिया गावाजवळ एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा काही शेतकऱ्यांनी केंद्रशासनाच्या ३ कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी भाजप नेत्यांच्या विरोधात आंदोलन केले. तेव्हा सरकारच्या वाहनाखाली येऊन २ शेतकरी मारले गेले असल्याचा आरोप केला जात आहे.

यानंतर हिंसक झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या जमावाने भाजपच्या ४ कार्यकर्त्यांना जिवे मारले. त्यांनी सरकारच्या एका चारचाकी वाहनाला आग लावली असून या हिंसक घटनेचे विविध व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना काठ्यांनी मारले जात असल्याचे दिसत आहे.

हे षड्यंत्र असून आंदोलनकारी लोकांनी भाजपच्या एका चारचाकी वाहनचालकाला दगड मारल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्या अपघातात वाहनाखाली येऊन दोन शेतकऱ्यांचा जीव गेला, असे भाजपने स्पष्ट केले आहे. मिश्रा यांनीही सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शेतकऱ्यांची संघटना ‘संयुक्त किसान मोर्च्या’ने मात्र यामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा हात असून तो असलेल्या गाडीखाली शेतकरी येऊन मारले गेले, असा आरोप केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटले असून घटनेच्या मुळाशी जाऊन त्यात सहभागी असणार्या सर्व घटकांना समोर आणले जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

 

या घटनेचे राजकारण केले जात असून अनेकांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत हे लखीमपूर खेरीसाठी निघाले असल्याचे समजते. तसेच विविध शेतकरी संघटना सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.