साम्यवादी विचारसरणीच्या अरुंधती रॉय भारतातील असहिष्णुतेवर बोलतात, त्या वेळी भारतातील सर्व प्रसारमाध्यमे संपूर्ण देशातील नागरिकांची भावना असल्याप्रमाणे भारत आणि भारत सरकार यांना जगभरात अपकीर्त करण्याच्या प्रयत्नांत असतात. चीन आणि अमेरिका यांची कुटील नीती त्यासाठी आर्थिक पाठबळ देत असते. या सर्वांना तोंडघशी पाडणारा एक अहवाल अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने घोषित केल्याने भारतातील सहिष्णुतेवर पुन्हा एकदा चर्चा प्रारंभ झाली आहे. अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतातील सहिष्णुता धार्मिक सलोखा, स्वातंत्र्य आणि जातीपंथातील विविध मतांचा ऊहापोह करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याविषयी दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीमध्ये पी. कामत यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संकलित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
भारतातील धार्मिक सहिष्णुता अबाधित !
या सर्वेक्षणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याची ! भारतातील ९१ टक्के हिंदू, ८९ टक्के मुसलमान, ८९ टक्के ख्रिस्ती, ८२ टक्के शीख, ९३ टक्के बौद्ध आणि ८५ टक्के जैन समाजाच्या नागरिकांनी देशात धार्मिक स्वातंत्र्य मिळत असल्याचे स्पष्ट केले, तर अन्य धर्मियांना आदर देण्याविषयी ८५ टक्के हिंदू, ७८ मुसलमान आणि ७८ टक्के ख्रिस्ती आग्रही आहेत. धर्मांतरालाही अधिकांश लोकांचा विरोध असून ६६ टक्के नागरिक आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधात असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. त्याचप्रमाणे विविध धार्मिक गटांतील नागरिकांना अन्य धर्मांविषयी आदरभावाची भावना त्याच टक्केवारीत आहे. जातीबाहेर महिला आणि पुरुष यांनी लग्न करण्याच्या विरोधात असलेल्यांची संख्याही ६६ टक्के आहे. भारतातील आणि विदेशातील साम्यवादी विचारसरणीच्या भारतीय बुद्धीवाद्यांना वरील टक्केवारीविषयी आक्षेप आहे.
सहिष्णुतेचा हिंदु !
१५व्या शतकात स्पेनमधील रोमन कॅथॉलिक पंथाचे धर्मगुरु फ्रांसिस झेवियर याने केवळ गोव्यातच साडेतीन सहस्र हिंदू आणि १५० ज्यू यांना आगीत होरपळून ठार केल्याची नोंद आहे. याच रोमन पंथाच्या धर्मगुरूंनी १०० वर्षांपूर्वी कॅनडातील आदिवासी नागरिकांच्या कोवळ्या मुलांची हत्या केल्याचे प्रकरण मासाभरापूर्वीच उघडकीस आले आहे. ख्रिस्ती धर्मगुरूंची अमानुषता पहाता भारतातील तथाकथित असहिष्णुता एक टक्काही भरणार नाही. हिंदु धर्मात केवळ माणसांवरच प्रेम करायला नव्हे, तर जीवसृष्टीलाही जीव लावणारी संस्कृती आणि परंपरा निर्माण करण्यात आली आहे.
कथित बुद्धीवाद्यांचा आक्षेप !
ठराविक विचारसरणीच्या केवळ २ सहस्र ७०० लोकांची ऑनलाईन पद्धतीने मुलाखत घेऊन भारतावर असहिष्णुतेचा आरोप करणार्या ‘रॉयटर’ या चर्चसंस्थेच्या प्रसारमाध्यमातील अहवालावरून संपूर्ण जगात हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा विडा उचललेल्या या साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी आता ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालाला बोटे दाखवण्यास चालू केले आहे. विदेशात कमाई करणार्या या भारतीय बुद्धीवाद्यांना प्रत्युत्तर देतांना ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारताच्या संदर्भातील हा अहवाल ३० सहस्र प्रौढ भारतीय नागरिकांच्या प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे सिद्ध केल्याचे स्पष्ट केले आहे.
असत्याचा आधार ढासळला !
अमेरिकास्थित ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतात धार्मिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुता अबाधित असल्याचा निष्कर्ष त्याच्या अहवालात काढल्याने असत्याच्या आधाराने भारताला अपकीर्त करणार्या गोतावळ्याला नक्कीच धक्का बसलेला आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतातील असहिष्णुता वाढत असल्याचे ‘रॉयटर’च्या अहवालातील असत्य थेट संयुक्त राष्ट्रांच्या पटलावर मांडण्याचा प्रयत्न केला.’
(साभार : दैनिक तरुण भारत, गोवा, ४.७.२०२१)