१९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद ! – राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

कोल्हापूर, ३० सप्टेंबर (वार्ता.) – १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे २० वी ऊस परिषद होईल. ‘एफ्.आर्.पी.’चे तुकडे करणार्‍यांच्या विरोधात ‘जागर एफ्.आर्.पी.चा, आराधना शक्तीस्थळांची’ या आंदोलनाचा प्रारंभ जोतिबा डोंगरावर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी होईल. दसर्‍याला जेजुरी येथे मेळावा घेत आंदोलनाची सांगता होईल. आमचा दसरा कडवट झाला, तर तुमची दीपावली गोड होऊ देणार नाही, अशी चेतावणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. (राजू शेट्टी यांचा आजवरचा इतिहास पहाता त्यांच्या संघटनेने दुधाचे टँकर ओतून देणे, दूध वितरण होऊ न देणे, दुधाच्या गाड्या फोडणे, ऊस वाहतूक करणार्‍या गाड्या पेटवणे-फोडणे, अशी हिंसक आंदोलने केली आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या अशा आंदोलनांचा सरकारने वेळीच बंदोबस्त करणे अपेक्षित आहे ! – संपादक)

राजू शेट्टी पुढे म्हणाले, ‘‘शेतकर्‍यांना उसाच्या देयकाचे पूर्ण पैसे मिळावेत, असे साखर कारखानदारांना वाटत नाही. त्यामुळे निती आयोगाला हाताला धरून ‘एफ्.आर्.पी.’ तुकडे पाडण्याचे काम चालू केले आहे. ऊस तोडल्यावर १४ दिवसांत ६० टक्के ‘एफ्.आर्.पी.’, त्यानंतर पुढच्या १४ दिवसांत २० टक्के ‘एफ्.आर्.पी.’ आणि त्यानंतर २ मासात २० टक्के उर्वरित ‘एफ्.आर्.पी.’ द्या, अशी मागणी आम्ही केली आहे. १९ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या ऊस परिषदेसाठी कुणाची अनुमती मागणार नाही.’’ (कोरोनाविषयक नियमांची पायमल्ली करत थेट सरकारला चेतावणी देणार्‍या विधानांची सरकारने नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी ! – संपादक)