महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई ‘संगीत विशारद (तबला)’ यांना तबलावादनाचा सराव करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

‘मी मागील १७ वर्षांपासून तबल्याचे शिक्षण घेत असून गेल्या ४ वर्षांपासून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने होणार्‍या ‘संगीत’ विषयाच्या संशोधनाच्या कार्यात सहभागी आहे. सध्या मी प्रतिदिन तबलावादनाचा एक ते दीड घंटा सराव करत आहे. हा सराव करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

१. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तबल्याच्या बोलांवर श्रीकृष्णाच्या संदर्भातील ओळी सुचून भावजागृती होणे

३०.८.२०२१ या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर मला तबल्याच्या बोलांवर श्रीकृष्णाविषयी दोन ओळी सुचल्या.

तबल्याचे बोल : धा घीना तेटे तेटे घीना ।
सुचलेले शब्द : अधूरा है सब कृष्ण तेरे बिना ।

तबल्याचे बोल : घीना तेटे कत गदीगन ।
सुचलेले शब्द : कृष्णमय होने दो हमारा अंतर्मन ।।\

या ओळी सुचल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली.

२. एका कायद्याच्या मुखाचा विविध पट्ट्यांच्या तबल्यांवर सराव करतांना आलेल्या अनुभूती

तबल्याची पट्टी (नाद) ही तानपुरा किंवा संवादिनी यांच्या स्वरपट्टीवरून निश्चित केली जाते. त्यानुसार विविध पट्ट्यांचे तबले असतात.‘काळी १’ हा वरच्या स्वराचा, ‘काळी ५’ हा ‘काळी १’ पेक्षा खालील स्वराचा आणि ‘काळी ४’ हा ‘काळी ५’ पेक्षा खालील स्वराचा तबला असतो.

८.९.२०२१ या दिवशी पुढील ‘कायद्याचे मुख’ (टीप) मी अनुक्रमे ‘काळी १’, ‘काळी ५’ आणि ‘काळी ४’ या पट्ट्यांच्या तबल्यांवर प्रत्येकी २० मिनिटे वाजवले. त्या वेळी मला पुढील तुलनात्मक सूत्रे जाणवली.

टीप : कायद्याचे मुख : तालाचे स्वरूप कायम ठेवून ज्याचा विस्तार करता येईल, अशा बोल समुहाच्या नियमबद्ध रचनेला ‘कायदा’ म्हणतात. या कायद्याची मूळ रचना दर्शवणार्‍या मूळ बोलसमुहाला ‘कायद्याचे मुख’ असे म्हणतात. त्यापासूनच पुढे कायद्याचा विस्तार केला जातो.

बोल

धीट धाग धींना घीन धीट धाग धींना घीन ।
धीट धीट धातीट धागेन धाग तींना कीन ।
तीट ताक तींना कीन तीट ताक तींना कीन ।
धीट धीट धातीट धागेन धाग धींना घीन ।

२ अ. ‘काळी १’ पट्टीचा तबला

१. ‘तबल्याचा नाद आणि माझा आंतरिक नाद हे एकमेकांशी जोडले जात नाहीत’, असे माझ्या लक्षात आले.

२. मला बाह्य आनंद जाणवत होता.

२ आ. ‘काळी ५’ पट्टीचा तबला

१. माझ्या मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून झाले.

२. ‘तबल्याचा नाद आणि माझा आंतरिक नाद हे एकमेकांशी काही प्रमाणात जोडले जात आहेत’, असे मला जाणवले.

३. मला बाह्य आणि आंतरिक आनंद जाणवत होता.

२ इ. ‘काळी ४’ पट्टीचा तबला

१. माझ्या मनातील अनावश्यक विचार अत्यल्प झाले.

२. ‘तबल्याचा नाद आणि माझा आंतरिक नाद हे एकमेकांशी अधिक प्रमाणात जोडले गेले आहेत’, असे मला जाणवले.

३. मला आंतरिक आनंद अधिक जाणवून मी त्या आनंदाच्या स्थितीत बराच वेळ होतो.

(‘संगीतात मंद्र, मध्य आणि तार अशी तीन सप्तके आहेत. मंद्र म्हणजे खालचे (खर्ज) स्वर, मध्य म्हणजे मध्य स्वर आणि तार म्हणजे उंच स्वर. यांपैकी मंद्र सप्तकातील स्वरगायन आणि वादन आध्यात्मिकदृष्ट्या पोषक आहे. त्यामुळे साधना करणारा गायक किंवा वादक या स्वरांशी अंतरातून जलद जोडला जातो. स्वर जेवढ्या उंच पट्टीतील असतील, तेवढी त्यांची बहिर्मुखता वाढत जाते. यामुळे साधकाला इतर तबल्यांच्या तुलनेत ‘काळी ४’ या पट्टीच्या तबल्यावर सराव करतांना अंतर्मुखता आणि आंतरिक आनंद जाणवला.’ – संकलक )

३. एकच कायदा विविध लयींत वाजवल्यावर जाणवलेली सूत्रे

९.९.२०२१ या दिवशी मी वरील कायदा ‘काळी १’ च्या तबल्यावर द्रुत (जलद) आणि विलंबित (संथ) लयींत वाजवला. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.

३ अ. द्रुत लयीत (जलद गतीने) वाजवणे

१. माझे लक्ष माझ्या वादनाकडे अधिक होते. ‘मी एखाद्या कार्यक्रमात तबला वाजवत आहे’, असे मला जाणवत होते.

२. त्या वेळी माझी बहिर्मुखता वाढली होती.

३ आ. विलंबित लयीत (संथ गतीने) वाजवणे

१. ‘हे तबल्याचे बोल केवळ अक्षरे नसून देवासाठी करत असलेल्या प्रार्थना आहेत आणि त्या माध्यमांतून ‘मी देवाला आळवत आहे’, असे मला जाणवले.

२. त्या वेळी ‘मी देवाच्या समोर बसून वादनातील बोलांशी आनंदाने खेळून तबला वाजवत आहे आणि पुष्कळ आनंद अनुभवत आहे’, असे मला जाणवले.

३. हे तबलावादन करत असतांना ‘माझ्या भोवती कुणीतरी नृत्य करत आहे’, असेही मला काही क्षण जाणवले. संगीताच्या माध्यमातून साधना करणार्‍या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांना किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी मला ‘तबला वाजवतांना रागिणी देवतेला (नाददेवतेला) अनुभवण्याचा प्रयत्न कर’, असे सांगितले होते. त्यांनी सांगितल्यानुसार मला या वेळी अनुभवता आले.

(‘द्रुत (जलद) लयीत रजोगुण अधिक असतो, तर विलंबित (संथ) लयीत सत्त्वगुण अधिक असतो. त्यामुळे साधकाला द्रुत लयीपेक्षा विलंबित लयीत देवाशी अल्प कालावधीत अनुसंधान साधता येते.’ – संकलक)

या अनुभूती मला परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आल्या. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला)), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.९.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक