ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास मंत्रालयात त्यांच्या जावयाचा १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, माजी खासदार

डावीकडून किरीट सोमय्या आणि हसन मुश्रीफ

कोल्हापूर, २८ सप्टेंबर – ग्रामविकास मंत्रालयाने राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे मूल्यवर्धित कर, ‘टी.डी.एस्.’, ‘टी.सी.एस्.’ रिटर्न भरण्यासाठी १८ जानेवारी २०२१ ला निविदा काढली होती. हे भरण्यासाठी केवळ ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. १ सहस्र ५०० कोटी रुपयांच्या या निविदा भरण्यासाठी केवळ ७ दिवसांचा कालावधी का ? हसन मुश्रीफ यांनी त्यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित आस्थापनाला ही निविदा देण्यासाठीच हे सर्व केले. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास मंत्रालयात त्यांच्या जावयाने १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी २८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला.

किरीट सोमय्या यांनी २८ सप्टेंबर या दिवशी मुरगुड पोलीस ठाण्यात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. कोल्हापूर येथील दिवाणी न्यायालयात हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूहानीचा दावा प्रविष्ट केला आहे.

माझ्या जावयाने घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप खोटा ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

कोल्हापूर – किरीट सोमय्या यांनी केलेल्या संबंधित योजनेसाठीचा निधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्यांच्या स्वनिधीतून उभारणार होते. त्यामुळे राज्य सरकारची यात कोणतीही भूमिका नाही. भ्रष्टाचारच करायचा असता, तर राज्य सरकारने त्यांच्याकडे पैसे दिले असते. १० मार्च २०२१ ला आस्थापनाला एकही ‘ऑर्डर’ मिळालेली नाही. त्यामुळे माझ्या जावयाने घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप खोटा आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना दिली.