(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनाचा निषेध !’ – तालिबान

जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत विषय आहे. याविषयी तालिबानने नाक खुपसायची आवश्यकता नाही, अशा शब्दांत भारताने फुटकळ तालिबानला फटकारले पाहिजे. तसेच यापुढे अशी विधाने केल्यावर सैनिकी कारवाई करू, अशी चेतावणीही दिली पाहिजे ! – संपादक

तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद

काबुल (अफगाणिस्तान) – जगातील काही भागांमध्ये मुसलमानांना अयोग्य वागणूक दिली जात आहे. मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. ही चिंताजनक गोष्ट असून आम्ही त्याच्याविरोधात आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. आम्ही त्याचा निषेध करत आहोत, असे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या माहिती खात्याचा उपमंत्री आणि तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे. यापूर्वी तालिबानने ‘काश्मीर भारताचे अंतर्गत सूत्र आहे’, असे म्हटले होते. त्यानंतर त्याने ‘जगभरातील मुसलमानांसाठी आवाज उठवू’, असेही म्हटले होते.

पाकचे कौतुक !

जबीउल्लाह याने पाकविषयी बोलतांना म्हटले की, पाकिस्तान हा आमचा शेजारील देश आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानविषयी घेतलेल्या भूमिकेसाठी आम्ही आभारी आहोत.

अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायासमवेत चांगले संबंध हवे आहेत. आम्हाला व्यापार आणि आर्थिक संबंध आणखी वृद्धींगत करायचे आहेत. आमचे शेजारचे देश आंतरराष्ट्रीय समुदायासमोर अफगाणिस्तानला पाठिंबा देणे चालू ठेवतील, अशी अपेक्षा आहे. (असे संबंध ठेवण्यासाठी स्वतः सुसंस्कृत आणि लोकशाही व्यवस्था असणारा देश असणे आवश्यक आहे. आतंकवाद्यांनी त्यांच्यासमवेत इतरांनी चांगले संबंध ठेवावे, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे, हे तालिबाने लक्षात ठेवायला हवे ! – संपादक)