‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग पाहून स्वत:त पालट करणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कै. (कु.) तनिष्का म्हात्रे (वय ११ वर्षे) !

१६.९.२०२१ या दिवशी विजेचा  तीव्र धक्का बसल्याने कामोठे, जिल्हा रायगड येथील कु. तनिष्का म्हात्रे हिचे निधन झाले. आज २७ सप्टेंबर या दिवशी कु. तनिष्का हिच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला मे २०२० मध्ये तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (कु.) तनिष्का म्हात्रे

‘माझी मुलगी कु. तनिष्का (वय ११ वर्षे) ही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित पहात असे. ते पाहू लागल्यावर तिच्यात चांगले पालट झाले.

१. तिला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. त्यामुळे पूर्वी तिला काही सांगितले, तरी ती उलट उत्तर द्यायची; पण ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग पाहू लागल्यापासून ती त्यात सांगितल्यानुसार कृती करत असे. ती थोडी स्थिर झाली.

सौ. पल्लवी म्हात्रे

२. बालसंस्कार वर्गांमुळे तिला साधनेसाठी स्फूर्ती मिळाली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव कसा पाहिजे ?’, हे तिला आतूनच उमजत असल्याचे तिच्या कृतीतून मला जाणवायचे.

३. काही दिवसांपूर्वी तिने मला विचारले होते, ‘‘मी स्वभावदोष सारणीत चुका लिहिणे चालू करू का ?’’

४. तनिष्का मला घरातील कामे, तसेच स्वयंपाक बनवणे इत्यादींमध्ये साहाय्यही करत असे.

५. १४.४.२०२० या दिवशी त्या बालसंस्कारवर्गात सांगितले की, जुने ‘सनातन पंचांग’ अन् दैनिक ‘सनातन प्रभात’ यांतील वैशिष्ट्यपूर्ण लिखाण किंवा चित्रे कापून कागदावर चिकटवा. त्यानंतर तिने लगेच घरातील दैनिक ‘सनातन प्रभात’चे जुने रंगीत अंक शोधून त्यातील काही चित्रे कापून परात्पर गुरुदेवांसाठी दोन भेटपत्रे बनवली.

६. तनिष्काने ग्रंथावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मितहास्य करणारे छायाचित्र पाहून त्यांच्यामधील देवत्व ओळखणे : तनिष्काने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावर परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मितहास्य करणारे छायाचित्र पाहून मला विचारले होते, ‘‘हे नेहमी हसत असतात. आपण कसे दुःख झाल्यावर रडतो, तसे हे रडत नाहीत का ? यांना दुःख होत नाही का ?’’ नंतर परात्पर गुरुदेवांचे ते स्मितहास्य करणारे छायाचित्र पाहून तनिष्काने त्यांच्यावर पुढील कविता केली. ती इंग्रजी माध्यमातून शिकत असल्याने तिने ही कविता माझ्याकडून भेटपत्रात मराठी भाषेत लिहून घेतली.’

तुम्ही असता सतत हसत । नाही दिसत कधी दुःखात ।
तुम्हाला बघून असे वाटते की । देवच आहे तुमच्यात ।।

– सौ. पल्लवी म्हात्रे (कु. तनिष्काची आई), कामोठे, जिल्हा रायगड. (१४.५.२०२०)