संभाजीनगर येथे खराब भ्रमणभाष संच परत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन !

अंगणवाडी सेविकांची पोलिसांसमवेत झाली झटापट !

सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिलेले भ्रमणभाष संच लगेच कसे बंद पडतात ? तसेच अंगणवाडी सेविकांनी वारंवार मागणी करूनही प्रशासन त्यावर उपाययोजना का काढत नाही ? याविषयी संबंधित अधिकारी आणि भ्रमणभाष संच पुरवणारे ठेकेदार यांची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही अपेक्षा ! – संपादक

पोलीस आणि अंगणवाडी सेविका यांच्यात झटापट

संभाजीनगर – येथील अंगणवाडी सेविकांच्या वतीने २४ सप्टेंबर या दिवशी जिल्हा परिषदेसमोर ‘मोबाईल वापसी’ (खराब झालेले भ्रमणभाष संच परत देणे) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी अंगणवाडी सेविका बंद पडलेले भ्रमणभाष संच बालकल्याण समिती कार्यालयात फेकण्यासाठी घेऊन जात असतांना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली. शेवटी कार्यालयाबाहेर सर्व भ्रमणभाष संच फेकून अंगणवाडी सेविका रागारागाने निघून गेल्या.

अंगणवाडी सेविकांना महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आलेले भ्रमणभाष संच खराब असल्याची तक्रार अनेक वेळा करण्यात आली होती, तसेच या विषयावरून आंदोलनही करण्यात आले होते; मात्र प्रशासनाकडून त्याची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारास संतापून अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यासाठी त्यांनी खिकडपुरा येथील ‘आयटक’ कार्यालयातून खराब भ्रमणभाष संचांची अंत्ययात्रा काढून सरकारी धोरणांचा निषेध व्यक्त केला.

आयटकचे नेते कॉ. राम बाहेती म्हणाले, ‘‘अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले भ्रमणभाष संच निकृष्ट दर्जाचे असून त्यांची दुरुस्ती करण्याचा व्ययही परवडणारा नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याविषयी प्रशासनाने सकारात्मक विचार न केल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे.’’