गरोदरपणामध्ये नैराश्यात असणार्‍या माता-पित्यांमुळे मुलांमध्येही होतो मानसिक आजार ! – ब्रिस्टल विश्‍वविद्यालयातील मानसोपचार तज्ञांचा अभ्यास

यावरून समाजातील प्रत्येक घटकाला साधना शिकवणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते ! हिंदु संस्कृतीत गरोदर महिलेला धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, साधना करणे, आदी गोष्टी करण्यास सांगितल्या जातात. ते का आवश्यक असते, हे या अभ्यासावरून लक्षात येईल ! – संपादक


लंडन (ब्रिटन) – गरोदरपणामध्ये ज्या महिला निराश असतात त्यांच्या मुलांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. ही मुले मोठी झाल्यावर त्यांच्यामध्ये नैराश्याचे प्रमाण अन्य मुलांच्या तुलनेत अधिक असते, असे ब्रिटनमधील ब्रिस्टल विश्‍वविद्यालयातील मानसोपचार तज्ञांनी एका अभ्यासाच्या आधारे हा दावा केला. १४ वर्षे हा अभ्यास चालला. या काळात ५ सहस्रांपेक्षा अधिक मुलांचे वय २४ वर्षे होईपर्यंत त्यांच्या मानसिक आरोग्याकडे नियमित लक्ष ठेवण्यात आले.

१. मानसोपचार तज्ञांच्या मते, प्रसूतीनंतर जरी महिला नैराश्यात असली, तरी मुलावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गर्भावस्था आणि मुलाच्या जन्मानंतरही माता-पित्याने त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

२. ज्या मुलांच्या मातांना प्रसूतीनंतर नैराश्याचा सामना करावा लागला अशा मुलांची किशोरावस्थेतील नैराश्याची स्थिती आणखी वाईट झाली. त्या तुलनेत ज्या महिलांना गर्भावस्थेच्या काळात मानसिक त्रास झाला, त्यांच्या मुलांत नैराश्याची पातळी सरासरीएवढी होती. ज्या मुलांच्या माता गर्भावस्था आणि प्रसूती या दोन्ही काळांत निराश होत्या, अशा मुलांना सर्वाधिक मानसिक त्रास झाला.

३. ‘रॉयल कॉलेज ऑफ सायकॅट्रिस्ट’ या मानसोपचार तज्ञांच्या संघटनेचे डॉ. जोआन ब्लॅक म्हणाले की, आई-वडिलांवर परिणाम झाला असेल, तर मुलांनाही भविष्यात मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातील चांगली गोष्ट म्हणजे यावर उपचार होऊ शकतात. केवळ लवकर साहाय्य घेण्याची आवश्यकता आहे.

४. ‘रॉयल कॉलेज ऑफ सायकॅट्रिस्ट’च्या ताज्या अंदाजानुसार कोरोनाच्या काळात १६ सहस्रांपेक्षा अधिक महिलांना प्रसूतीनंतर आवश्यक साहाय्य मिळू शकले नाही. त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला.

५. या संशोधन गटातील डॉ. प्रिया राजगुरु यांच्या मते, वडील नैराश्यात असल्याचा परिणामही मुलांवर होतो; पण हे केवळ एका अवस्थेतील नैराश्य असल्याने मुलांवर अल्प परिणाम होतो. किशोरावस्थेत मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी पालकांना मुलाच्या जन्माआधी प्रयत्न करावे लागतील.

६. प्रतिदिन देशातील २ सहस्रांपेक्षा अधिक किशोरवयीन मुले नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (एन्.एच्.एस्.च्या) मानसिक आरोग्य सेवेचे साहाय्य घेत आहेत. यावरून त्यांचे मानसिक आरोग्य किती बिघडले आहे, याचा अंदाज करता येतो. एन्.एच्.एस्.च्या आकड्यांनुसार केवळ एप्रिल ते जून या कालावधीत १८ वर्षांखालील १ लाख ९० सहस्र किशोरांना एन्.एच्.एस्. मानसिक आरोग्य सेवेकडे पाठवण्यात आले. ‘रॉयल कॉलेज ऑफ सायकॅट्रिस्ट’च्या मानसोपचार तज्ञांच्या मते, या मुलांवर आधीपासूनच दबाव होता. कोरोनामुळे त्यात आणखी वाढ झाली आहे.