२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने पितृपूजनाविषयीचे लिखाण…
सनातनच्या रामनाथी (फोंडा, गोवा) येथील आश्रमात १४.९.२०१९ या दिवशी श्रीविष्णुपूजन आणि देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे पितृपूजन करण्यात आले. आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात श्रीविष्णूचे आणि ऋषिपितरांचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे आपण वाचली. आजच्या अंतिम लेखात तीलतर्पण विधी केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/513513.html
३. सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी सनातनचे दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्यासाठी तीलतर्पण विधी करणे
३ अ. दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवून पू. वामन राजंदेकर यांच्या चरणांतून वातावरणात दत्ततत्त्व प्रक्षेपित होणे : तर्पण विधीला आरंभ होण्यापूर्वीपासून पूजनस्थळी दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवत होते. जेव्हा तर्पण विधी आरंभ झाला, तेव्हा सनातनचे बालकसंत पू. वामन राजंदेकर यांचे पूजनस्थळी स्थुलातून आगमन झाले. तेव्हा ते झोपले होते; परंतु त्यांच्यामध्ये दत्ततत्त्व कार्यरत होऊन ते त्यांच्या चरणांतून संपूर्ण वातावरणात प्रक्षेपित झाले आणि अनेक दिवंगत साधकांना सद्गती मिळाली. तेव्हा वातावरणात चैतन्य आणि आनंद यांच्या लहरी कार्यरत झाल्याचे जाणवले. यावरून बालकसंतांची सूक्ष्मातून कार्य करण्याची विलक्षण क्षमता अनुभवली.
३ आ. तीळयुक्त जल प्राशन केल्याने दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांची तृष्णा (तहान) शमणे : तर्पण विधी चालू झाल्यावर ऋषी आणि पितर यांच्या लहरी कार्यरत झाल्या. तीळयुक्त जल प्राशन केल्याने दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांची तृष्णा (तहान) शमल्याचे जाणवले. त्यामुळे ते साधकांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्व साधकांना गुरुकृपा प्राप्त करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्याचा आशीर्वाद दिला.
३ इ. तर्पणाच्या जलामध्ये सप्तनद्यांचे आवाहन केल्याने ते प्राशन करून अतृप्त पितर तृप्त होणे : तर्पणातील जलामध्ये सप्तनद्यांचे आवाहन केल्यामुळे त्या जलाला तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले. ते तीर्थ प्राशन करून सनातनच्या अतृप्त पितरही तृप्त झाले आणि त्यांची समस्त पापे नष्ट झाली अन् ते पितरयोनीतून मुक्त झाले. त्यांनी प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद दिला. त्यामुळे साधकांना होणारा पूर्वजांचा त्रास ३० टक्के न्यून झाला.
३ ई. तर्पणाच्या जलामध्ये अग्नीदेवाच्या ‘स्वधा’ शक्ती कार्यरत होणे : जलामध्ये अग्नीदेवाच्या ‘स्वधा’ या दुसर्या पत्नीची शक्ती कार्यरत झाली होती. स्वधाने स्थुलातील जलाचे रूपांतर सूक्ष्मातील जलामध्ये करून ते दिवंगत ऋषिपितरांपर्यंत पोचवण्याचे पुण्यकार्य केले. त्यामुळे पितरांनी स्वधालाही अखंड सौभाग्याचा आणि कार्यरत रहाण्याचा आशीर्वाद दिला. (अग्नीदेवाची प्रथम पत्नी ‘स्वाहा’ ही अग्नीमध्ये अर्पण केलेले हविष्य देवतांपर्यंत पोचवते, तर अग्नीदेवाची दुसरी पत्नी ‘स्वधा’ ही जल आणि अन्न पितरांपर्यंत पोचवते’- संदर्भ : सनातनचा ग्रंथ : ‘परमेश्वर आणि ईश्वर – भाग १’)
३ उ. तीन-चार साधकांना एकाच वेळी खोकला येण्याचे कारण : साधकांना होणारा पूर्वजांचा त्रास न्यून होऊन तो बाहेर पडला. त्यामुळे तर्पण विधी चालू असतांना ३-४ साधकांना एकाच वेळी खोकला आला.
३ ऊ. ऋषिपितरांसाठी तर्पण विधी चालू असतांना सूक्ष्मातून जाणवलेले सूत्र : ऋषिपितरांसाठी तर्पण विधी चालू असतांना जेव्हा दिवंगत साधकांसाठी तर्पण देण्यात आले. तेव्हा शक्तीची स्पंदने आणि उष्णता जाणवत होती. जेव्हा दिवंगत संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्यासाठी तर्पण विधी केला, तेव्हा वातावरणात चैतन्य, आनंद अन् शांती यांची स्पंदने पसरून सर्वत्र शीतलता जाणवली.
कृतज्ञता
‘हे भगवंता, तुझ्या कृपेने सनातनचे दिवंगत साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्यासाठी श्रीविष्णुपूजन, ऋषिपितर-पूजन आणि तर्पण विधी झाले अन् त्यांची तहान भागून त्यांनी मोक्षप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण केले. यासाठी आम्ही तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत.’
(समाप्त)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०१९, रात्री ११.५५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |