‘७.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, भाद्रपद मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. अमृत योग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृत योग’ किंवा ‘अमृतसिद्धी योग’ होतो. रविवारी हस्त नक्षत्र, सोमवारी मृग नक्षत्र, मंगळवारी अश्विनी नक्षत्र, बुधवारी अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल, तर ‘अमृत योग’ किंवा ‘अमृतसिद्धी योग’ होतो. अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. सोमवार, २७.९.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.४१ पासून मृग नक्षत्र असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत अमृत योग आहे.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्याला विलंब होण्याचा संभव असतो. २७.९.२०२१ या दिवशी दुपारी ३.४४ पासून उत्तररात्री ५.०२ पर्यंत आणि १.१०.२०२१ या दिवशी सकाळी १०.४२ पासून रात्री ११.०४ पर्यंत विष्टी करण आहे.
२ इ. गजगौरी व्रत (हादगा-भोंडला) : सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो, त्या दिवसापासून गजगौरी व्रताला आरंभ होतो. या व्रतामध्ये देवी गजगौरीचे पूजन केले जाते. या दिवशी देवीस्तोत्र, देवीकवच, अर्गलास्तोत्र, कनकस्तोत्र आदी देवीस्तोत्रांचे वाचन करतात. ‘यामुळे समृद्धी प्राप्त होते’, असे म्हटले जाते. हादगा-भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात विशेष प्रचलित आहे. यामध्ये स्त्रिया गाणी म्हणत सामूहिक नृत्य करतात.
२ ई. यमघंट योग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. मंगळवारी २८.९.२०२१ या दिवशी रात्री ८.४४ पासून आर्द्रा नक्षत्र असल्याने सूर्याेदयापर्यंत यमघंट योग आहे.
२ उ. कालाष्टमी : प्रत्येक मासातील प्रदोषकाळी असलेल्या कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी शिवोपासना करतात. या दिवशी शिवाच्या भैरव स्वरूपाची उपासना करतात. २९.९.२०२१ या दिवशी रात्री ८.३० पर्यंत अष्टमी तिथी आहे.
२ ऊ. अविधवा नवमी : सौभाग्यवती मृत झाल्यावर त्यांच्यासाठी भाद्रपद कृष्ण नवमी तिथीला ‘अविधवा नवमी’चे श्राद्ध करतात. वडील हयात (जिवंत) असेपर्यंत मुलाने (मुलगा नसेल, तर पतीने) अविधवा नवमीचे श्राद्ध करावे. ३०.९.२०२१ या दिवशी ‘अविधवा नवमी’ आहे.
२ ए. गुरुपुष्यामृत योग : गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. ३०.९.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.३३ पासून दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी ‘सुवर्ण खरेदी करणे आणि शुभ कार्ये करणे’, असा प्रघात आहे. हा योग रात्री असल्याने सुवर्ण खरेदी करणे शक्य नाही; परंतु साधकांनी ‘गुरुपुष्यामृत योगा’वर अधिकाधिक साधना करणे आवश्यक आहे. या योगावर ‘प्रज्ञाविवर्धन’ स्तोत्राचे पुरश्चरण केल्यास बुद्धीची वाढ होते.
२ ऐ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ३०.९.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.३३ पासून १.१०.२०२१ या दिवशी रात्री ११.०४ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ओ. इंदिरा एकादशी : भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशीला ‘इंदिरा एकादशी’ म्हणतात. २.१०.२०२१ या दिवशी इंदिरा एकादशी आहे. या दिवशी ‘श्रीविष्णूच्या ‘हृषिकेश’ रूपातील पूजनाने सुखप्राप्ती आणि विष्णुलोक प्राप्त होतो’, असे मानले जाते. या दिवशी श्रीविष्णुसहस्रनाम वाचावे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१०.९.२०२१)