मुलांना योग्य पद्धतीने घडवा !

आई-वडिलांना संस्कार करण्याविषयी शिकवण्याची वेळ येणे, हे नैतिकता रसातळाला गेल्याचे लक्षण ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

आई-वडील आणि मुले हे नाते अन्य नात्यांपेक्षा पुष्कळ वेगळे असते. त्या नात्यातील प्रेम, ममत्व, आदर, संस्कारांची शिदोरी यांची तुलना आपण अन्य नात्यांशी करू शकत नाही; पण सध्याच्या काळात ही जीवनमूल्ये आणि संस्कार कुठेतरी लोप पावत चालले आहेत, असे वेगवेगळ्या प्रसंगांतून दिसून येते. कधी आई-वडिलांचे वादविवाद विकोपाला जातात, तर काही वेळा मुलेच ऐकत नाही, असे प्रसंग घडतात. त्यामुळे एकूणच काय, तर कौटुंबिक परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. काही वेळा मुलांच्या अतीलाडापायी ममत्व आणि प्रेम यांची जागा भावनेने घेतलेली असते.

एका कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांची २ मुले (मुलगा आणि मुलगी) असे आहेत. मुलांनी ऐकले नाही की, आई-वडील त्यांना ओरडतात किंवा चुकांची जाणीव करून देतात; पण बरेचदा असे होते की, वडिलांचा ओरडा पडला की, मुले आईला दोष देतात आणि आई ओरडू लागली की, वडील कसे चुकीचे आहेत, हे मुलेच सांगू लागतात. एकदा तर ‘आई कशी चुकली आहे आणि तुम्ही तिला मारणे कसे योग्य आहे’, हे त्यांची मुलगी सांगत होती. भावनेचा उद्रेक होऊन शेवटी वडिलांनी मुलांच्या आईला (स्वतःच्या पत्नीला) मुलांसमोरच मारले (मारल्याचे नाटक केले). अर्थात् मुलांपर्यंत संदेश काय पोचला की, आईच चुकली होती ! हे कितपत योग्य आहे ? खरेतर ‘आई सांगते, ते कसे योग्य आहे’, हे वडिलांनी पटवून द्यायला हवे होते; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तसे न होता मुलांच्या नजरेत ‘आई’च चुकीची ठरली. हा प्रकार चिंताजनक आहे; कारण आज एका प्रसंगात असे घडले, उद्या अशा अनेक प्रसंगांत आई-वडील कसे चुकत आहेत’, असे मुलांना वाटून त्याची परिणती कुटुंबकलह निर्माण होण्यात होऊ शकते. आई-वडिलांनी योग्य तो सुसंवाद साधून मुलांना घडवणे, त्यांना वळण लावणे हे आवश्यक असते; पण सध्या तसे न होता ‘मुले म्हणतील ती पूर्वदिशा’ असेच चित्र बर्‍याच ठिकाणी पहायला मिळते. हे अत्यंत अयोग्य आणि गंभीर आहे. अशा वेळी श्यामच्या आईची आठवण येते. प्रत्येक प्रसंगात श्यामला दिशादर्शन करणारी, संस्काररूपी अनमोल शिकवण देऊन ती जपण्यास शिकवणारी आई त्याला लाभली होती. आज आई-वडिलांनाही संस्कार म्हणजे काय ? हे आता शिकवण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. प्रत्येक आई-वडिलांनी या सगळ्याचा विचार करून कर्तव्यभान जोपासायला हवे.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.