‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’
स्वतःकडून चूक झाल्याचे कळल्यावर वाईट वाटले, तरच त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न होतो !
‘साधना करतांना झालेल्या चुकांकडे बघण्याचा दृष्टीकोन केवळ ‘त्या शिकण्यासाठी आहेत’, असा वरवरचा राहिला, तर त्यातून अपेक्षित पालट होण्याची गती अतिशय अल्प रहाते. चूक झाल्याचे कळल्यावर प्रथम ‘माझ्याकडून ही चूक झाली’, याची खंत वाटली पाहिजे आणि वाईट वाटले पाहिजे. ही प्रक्रिया झाली, तरच त्या चुकीतून शिकणे होऊन जलद आध्यात्मिक प्रगती होऊ शकते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.८.२०२१)
दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. सध्या त्यांना अत्यंत शारीरिक त्रास होत असूनही ते बारकाव्यांनिशी दैनिक वाचतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० मे २०२१ पासून दैनिकातील अनेक चुका लक्षात आणून देण्यास प्रारंभ केला.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/512841.html
लिखाणातील तपशील अपूर्ण असणे, वर्णन सुस्पष्ट नसणे, लिखाणाची मांडणी लेखन सहजतेने समजेल, अशी नसणे, यांसारख्या चुकांमुळे वाचकांना लिखाण कंटाळवाणे वाटते. ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे लिखाण केवळ मनोरंजनासाठी किंवा माहितीच्या प्रसारणासाठी नसते. साधना, अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारे लिखाण वाचून वाचकांनी त्याप्रमाणे कृती करणे, आवश्यक ती पूर्वसिद्धता करणे अपेक्षित असते. अर्थ सहजतेने न समजल्यामुळे लिखाण वाचून होणारी पुढील प्रक्रिया मंदावते. लिखाण परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यात आवश्यक तो तपशील लिहिण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. असे असूनही ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातील तपशील सुस्पष्ट नसण्याच्या संदर्भात साधकांकडून चुका होतात. या चुका परात्पर गुरु डॉ. आठवले वेळोवेळी लक्षात आणून देतात. त्यातील काही चुका उदाहरणादाखल येथे प्रसिद्ध करत आहोत.
– श्री. भूषण केरकर (६७ टक्के आध्यात्मिक पातळी), सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके. (१८.९.२०२१)