नोंद
भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असलेले शासनकर्ते मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – संपादक
९ सप्टेंबर २०२१ या दिवशी नवी देहली येथील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न अन् नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) भुजबळ यांच्या विरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंद केले होते. मार्च २०१६ मध्ये ‘ईडी’ने छगन भुजबळ यांना अटक केली होती, तसेच ‘ईडी’ने त्यांची संपत्तीही जप्त केली होती. येथे सामान्यांना प्रश्न पडतो की, भुजबळ यांच्याविरुद्ध सर्व पुरावे असतांनाही त्यांची निर्दाेष मुक्तता कशी केली ? त्यांच्यावर कठोर कारवाई का झाली नाही ?
भुजबळ यांच्याप्रमाणेच राज्य शिखर बँकेतील ७० आजी-माजी संचालकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले ? लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘हा खटला बंद करावा’, असा न्यायालयात ‘क्लोजर’ (बंद पाकिटातील) अहवाल सादर केला. सिंचन विभागात ७० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता आणि त्याविषयी भाजपने पुष्कळ पुरावेही सरकारला दिले होते; मात्र २३ नोव्हेंबर २०१९ या दिवशी पहाटे शपथविधी सोहळा झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी सिंचन घोटाळ्याचे आरोप मागे घेण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले. हे सर्व प्रसंग आणि त्यानंतर घडलेले नाट्यमय पालट पाहिल्यास भारतातून भ्रष्टाचार कधी संपू शकत नाही ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? ‘पुरावे देऊन भ्रष्टाचार्यांना शोधून देण्यातही काही अर्थ नाही’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास तो देशासाठी पुष्कळ घातक आणि गंभीर आहे.
काँग्रेसने पेरलेली भ्रष्टाचाराची कीड संपूर्ण देशाला पोखरून टाकत आहे. ही कीड नष्ट करण्यासाठी ‘ती संपवण्याची प्रबळ इच्छाशक्ती’ असलेले शासनकर्ते हवेत. प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी धर्माचे अधिष्ठान हवे; कारण धर्मशिक्षणामुळे ‘एखाद्या चुकीच्या कृतीची शिक्षा ईश्वराच्या दरबारी किती गंभीर असते’, याचे ज्ञान होते. हे ज्ञान असलेली व्यक्ती ईश्वराने शिक्षा देण्याऐवजी कार्यपद्धतीनुसार गुन्हेगाराला शिक्षा देऊन त्याला त्याच्या पापाचे क्षालन करण्याची संधी देते. अशी संधी शासनकर्त्यांनी दिली नाही, तर ईश्वरी नियोजनानुसार भ्रष्टाचार केलेले आणि त्यांना पाठीशी घालणारे, अशा दोघांनाही शिक्षा होते. हे लक्षात घेऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
– श्री. सचिन कौलकर, मुंबई