भारतीय संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट मानवाला उपकारक आहे. हे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्यांनी लक्षात घ्यावे आणि भारतीय संस्कृतीनुसार आचरण करून जीवन सुखी करावे ! – संपादक |
प्रत्येकाला आपले स्वास्थ्य चांगले रहावे, असे वाटत असते. यासाठीच भारतीय संस्कृतीमध्ये हातांनी भोजन करणे अधिक योग्य ठरवण्यात आले आहे. यामागील शास्त्र आणि महत्त्व जाणून न घेतल्याने बहुतांश लोक हातांनी भोजन करण्याऐवजी चमचाने भोजन करणे पसंद करतात. काही संशोधकांनी हातांनी जेवण करण्यामागील कारणे जाणून घेतली. तेव्हा त्यांना हातांनी जेवण करण्यामागे कोणते विज्ञान दडले आहे, याची माहिती झाली.
१. आपले शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांनी बनलेले आहे. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या हाताच्या प्रत्येक बोटामध्ये ५ तत्त्वे सामावलेली आहेत. अंगठ्यामध्ये आकाश, तर्जनीमध्ये वायु, मध्यमामध्ये अग्नी, अनामिकेमध्ये पृथ्वी आणि सर्वांत लहान करंगळीमध्ये जल यांचे तत्त्व असते. त्यामुळे हातांनी जेवण केल्याने या पाचही बोटांच्या माध्यमातून शरिरातील पंचतत्त्वांचे संतुलन राखले जाते. त्यामुळे आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले रहाते.
२. तज्ञांनी केलेल्या अध्ययनाप्रमाणे हाताने जेवण केल्यामुळे पाचही तत्त्वे उत्तेजित होतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली रहाते. शिवाय मधुमेहासारख्या आजारांचा धोका अल्प होतो.
३. हाताने जेवल्यामुळे हात, तोंड, पोट, आतडे आणि बुद्धी यांच्यामध्ये एक संबंध निर्माण होतो. जो आपल्या आरोग्याला लाभदायक असतो. तज्ञांच्या मते, हातांनी जेवल्यामुळे पोट चांगल्या पद्धतीने भरते. त्यामुळे वजन न्यून होण्यासही साहाय्य होते.
४. हाताने जेवल्यामुळे आपले तोंड भाजत नाही; कारण अन्नाला हात लावल्यावरच अन्न किती उष्ण आहे, याचा आपल्याला अंदाज आलेला असतो. हाताने जेवण करतांना घास घेण्यासाठी पाचही बोटे एकत्र आल्याने जी मुद्रा बनते, त्यामुळे शरिरामध्ये विशेष ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे शरीर स्वस्थ रहाते.