पुणे येथील गणेश मंडपातील श्रींचे विसर्जन महापालिकेच्या फिरत्या हौदात करण्याचा पोलीस आयुक्तांचा अशास्त्रीय निर्णय !

हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती खड्डे आणि विहिरी बुजवणे यांसाठी वापरतात. भक्तीभावाने पुजलेल्या श्री गणेशाची अशी विटंबना होऊ देण्यापेक्षा धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास गणेशोत्सव मंडळांनी प्राधान्य द्यावे आणि शास्त्रसुसंगत कृती करून श्री गणेशाची कृपा संपादन करून घ्यावी !

पुणे, १८ सप्टेंबर – सलग दुसर्‍या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात अनुमाने ७ सहस्र पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे सकाळी १० वाजल्यापासून मंडपातच विसर्जन होईल. सर्व मंडळे आपल्या मंडपातील हौदात किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदातच श्रींचे विसर्जन करणार आहेत. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर पडू नये. विसर्जन सोहळा ऑनलाईन पहाण्यावरच भर द्यावा, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या बैठका झाल्या, त्यामध्ये वरील निर्णय घेण्यात आले.

गर्दी होऊ नये; म्हणून स्थानिक पोलीस ठाण्यांसमवेतच गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक यांचा बंदोबस्त रहाणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त हे बंदोबस्तावर देखरेख ठेवतील. त्यांच्यासमवेत १ राखीव पोलीस दलाचे पथक असेल. सकाळी ७ वाजल्यापासून बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्हीद्वारे सर्व ठिकाणी लक्ष देवले जात आहे. स्थानिक, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच मध्यवर्ती भागात प्रवेश असेल.