कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१७ ते २३.६.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्या आहेत. या नामजपाविषयीचे संशोधन २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(भाग ३)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/510337.html

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

४. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकांना झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती

कु. सोनल जोशी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

कु. सोनल जोशी

१. १७.६.२०२१ या दिवशी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

अ. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना मला ‘माझ्या मनात दिवसभरात आलेले विचार बाहेर पडत आहेत आणि नामजपामुळे ते विरघळत आहेत’, असे दिसले. मला माझ्या देहात थोडे जडत्व जाणवत होते; पण तरीही आतून चांगले वाटत होते.

आ. नामजप ऐकल्यावर मला पुष्कळ शांत वाटत होते. त्या वेळी मला ‘माझ्या शरिरातील सगळ्या क्रिया संथ झाल्या आहेत’, असे जाणवले. तेव्हा मला ‘गुरुतत्त्व कार्य करत आहे’, असे जाणवले.

२. आलेल्या चांगल्या अनुभूती

२ अ. १८.६.२०२१

१. ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाल्यावर माझ्या मनात कोणताही विचार नसतांना मला हा नामजप श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) रूपात दिसला. त्या वेळी माझी भावजागृती झाली. ‘हा नामजप गुरूंच्या रूपात प्रगट होऊन अनुभूती देत असावा’, असे मला वाटले. गुरूंचे रूप दिसल्याने हा नामजप करतांना मला गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे सोपे झाले.

२. त्या दिवशी ऐकलेल्या या नामजपाचा परिणाम दुसर्‍या दिवसापर्यंत टिकला.

३. हा नामजप ऐकण्यापूर्वी माझे डोके दुखत होते. नामजप ऐकल्यावर माझी डोकेदुखी न्यून झाली.

४. ‘शरिरात जाणवणारा संथपणा आदल्या दिवसाच्या तुलनेत थोडा न्यून झाला आहे’, असे मला जाणवले. आदल्या दिवसाच्या तुलनेत त्या दिवशी मला जास्त आनंद अनुभवता आला.

(प्रश्न : गुरूंच्या सगुण रूपाचे स्मरण झाल्याने त्यामध्ये भावाच्या लाटांमुळे हा संथपणा थोडा अल्प प्रमाणात अनुभवता आला असेल का ? – कु. सोनल जोशी) – हो

२ आ. १९.६.२०२१

१. हा नामजप ऐकतांना देवाने मला ‘हा नामजप वैखरीतून (पुटपुटत) करावा’, असा विचार दिला. वैखरीतून नामजप करतांना मला जांभया येऊन ‘माझे शरीर आणि मन यांभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत आहे, तसेच माझ्या शरिराचे जडत्व न्यून होत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर मला पुष्कळ मोकळे वाटले.

२. त्या दिवशी मला माझ्या शरिरात जास्त प्रमाणात संथपणा निर्माण झाल्याचे जाणवले.

२ इ. २०.६.२०२१

१. हा नामजप चालू असतांना मला देवाने ‘नामजपाच्या स्पंदनांचे आलंबन करावे’, असा विचार दिला. तसे करण्यास आरंभ केल्यावर माझ्या मनात दिवसभरात घडलेल्या प्रसंगांचे विचार थोडा वेळ आले. त्यानंतर ३-४ मिनिटांनी माझे मन निर्विचार झाले.

२. त्यानंतर मला ‘खोल पोकळी दिसणे, मन पुष्कळ शांत होणे आणि ध्यान लागणे’, अशा अनुभूती आल्या. नामजप संपल्यावर मला ‘डोळे उघडू नये’, असे वाटत होते. माझे लक्ष श्वासावर आपोआप केंद्रित होत होते.

३. काही वेळाने माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासाठी किती केले आहे !’, असे कृतज्ञतेचे विचार येऊ लागले आणि माझी भावजागृती होऊ लागली.

२ ई. २१.६.२०२१

अ. नामजप ऐकण्यापूर्वी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाच्या साहाय्याने परीक्षण केल्यावर माझ्याभोवती १.२ मीटर नकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षात आले. मला आदल्या दिवशी रात्री झोपतांना अस्वस्थता जाणवून उशिरा झोप लागली. त्यामुळे ‘सकाळी माझ्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण झाले आहे आणि त्यामुळे माझ्याभोवती नकारात्मक ऊर्जा आढळून आली’, असे मला वाटले.

आ. १० मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर मला हलके वाटले. त्यानंतर मला जांभया आल्या आणि ‘माझ्याभोवतालचे त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले आहे’, असे जाणवले. नंतर ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने परीक्षण केल्यावर माझ्याभोवती नकारात्मक ऊर्जा नसल्याचे लक्षात आले.

इ. ‘१० मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप केल्याने माझ्याभोवतालचे १.२ मीटर त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले, तर दिवसभर हा नामजप करण्याचा प्रयत्न केला, तर किती लाभ होईल ?’, याची मला जाणीव झाली. ‘देवाने माझ्या मनावर नामजपाचा संस्कार होण्यासाठी मला या प्रयोगात सहभागी होण्याची संधी दिली आहे’, असे मला वाटले.

२ उ. २२.६.२०२१

अ. या दिवशी नामजप करतांना माझ्या मनात ‘माझ्यावर नामजपाचा काय परिणाम होतो ?’, हे पाहूया’, असा विचार आला. नामजप चालू झाल्यावर १ – २ मिनिटांनी मला जांभया येऊ लागल्या. ‘त्या जांभयांच्या माध्यमातून माझ्या शरिरातील त्रासदायक शक्ती खेचल्याप्रमाणे बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले. मी ‘या जांभया कुठून येत आहेत ?’, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘त्या माझ्या अनाहतचक्राच्या खालच्या पोकळीतून येत आहेत’, असे मला जाणवले.

आ. ‘देवाने या नामजपाच्या साहाय्याने काल (२०.६.२०२१ या दिवशी) माझ्या शरिराभोवतालचे त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून केले आणि आज तो माझ्या देहातील रज-तम खेचून बाहेर काढत आहे’, असे मला वाटले.

३. हा नामजप करतांना ६ दिवसांच्या कालावधीत आलेल्या अन्य अनुभूती

अ. प्रतिदिन हा नामजप केल्यावर मला ‘मी पुष्कळ खोल पोकळीत गेले आहे’, असे जाणवले.

आ. नामजपाचा कालावधी १० मिनिटे असूनसुद्धा त्याचा परिणाम २-३ दिवस टिकून होता.

इ. ३ – ४ दिवस प्रतिदिन नामजप करत असल्याने ‘मी एका पोकळीत आणखी खोल खोल जात आहे’, असे मला जाणवले.

ई. त्या कालावधीत माझ्या मनात येणार्‍या नकारात्मक विचारांचा परिणाम मनावर अल्प काळ टिकला. कोणत्याही साध्या किंवा कठीण आणि ‘मन दुखावेल’, अशा प्रसंगांतून मला लवकर बाहेर पडता आले.

उ. माझ्या मनातील विचारांचे चढ-उतार अल्प होते.

ऊ. ‘या नामजपाने माझ्या मनाची एकाग्रता वाढली आणि मनात अन्य विचार नसल्याने सेवेची फलनिष्पत्ती वाढली’, असे माझ्या लक्षात आले. सेवा करतांना माझे मन निर्विचार झाले. त्या वेळी मला ‘शांत रहावे’, असे वाटत होते.

ए. हा नामजप केल्यावर दिवसभरात सेवा किंवा वैयक्तिक कृती करतांना माझ्या मनावर कोणत्याही विचारांचा ताण नव्हता, तसेच मनातील भावना न्यून होत्या. मला मध्ये मध्ये निर्विचार स्थिती अनुभवता आली.

‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘तुमच्या कृपेमुळेच मला या नामजपाने होणारे लाभ अनुभवता आणि अभ्यासता आले’, याकरता तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

(क्रमशः)

संकलक : कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२१.८.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक