आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी गुन्हा रहित होणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

जफर अली याने प्रसारित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘पोस्ट’चे प्रकरण !

साम्यवादी, पुरोगामी, चित्रपट व्यावसायिक आदी समाजमाध्यमांवर सातत्याने हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे संदेश प्रसारित करत असतात. हिंदू त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करू शकतात ! – संपादक 

मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

मुंबई – समाज माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरून अशी ‘पोस्ट काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही. त्याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून खटला चालवणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने व्यक्त केले. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकणे, हा पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार आहे, असेही उच्च न्यायालयाने पुढे म्हटले आहे.

वर्ष २०१९ मध्ये नागपूरमधील कन्हान येथे श्री दुर्गाेत्सवाच्या काळात जफर अली याने धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केली होती. त्या विरोधात मनीष सिंह यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. यावर पोलिसांनी अली याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच जफर अली पळून गेला. त्यानंतर त्याने सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. यानंतर तो पोलिसांसमोर उपस्थित झाला; परंतु त्याने त्याच्या भ्रमणभाषमधून ती ‘पोस्ट’ काढून टाकली होती, तसेच त्याच्यावरील गुन्हा रहित करण्यासाठी त्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात धाव घेतली होती.