शिक्षक आणि फॅशन !

देशाची भावी पिढी म्हणजेच विद्यार्थी आदर्श घडण्यासाठी प्रत्येक शिक्षक आदर्श हवा ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

‘शिक्षक आणि शिक्षण’ हे समीकरण तर सर्वांनाच ठाऊक आहे; पण ‘शिक्षक आणि फॅशन’ हे समीकरण झाल्यास विद्यार्थी घडतील का ? एका महाविद्यालयात शिकवणारी एक तरुण प्राध्यापिका तरुणी प्रतिदिन तिचे सेल्फी (स्वतःच स्वतःचे काढलेले छायाचित्र) व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’वर ठेवते. प्रतिदिन ‘पोस्ट’ केली जाणारी छायाचित्रे वेगवेगळी असल्याने साहजिकच महाविद्यालयीन तरुणाईला त्याविषयीची आकर्षण वाटते. यामुळे आपल्या शिक्षिकेने आज कोणते बरे छायाचित्र ठेवले आहे ? हे तरुण-तरुणी उत्सुकतेने पहातात. याचा परिणाम म्हणून प्राध्यापिकेने परिधान केलेली साडी, पंजाबी पोशाख, दागिने, केसांची पद्धत, ओष्ठशलाकेचा (लिपस्टिकचा) रंग यांविषयी तरुणाईमध्ये चर्चा होते. काही विद्यार्थी म्हणतात, ‘‘आमचे ‘रोल मॉडेल’ अमुक शिक्षक किंवा अमुक प्राध्यापिका आहेत; कारण ते शिक्षक हँडसम (सुंदर) दिसतात किंवा त्या प्राध्यापिका सुंदर दिसतात.’’ अशी चर्चा करणारी तरुणाई देशाचे भवितव्य कसे घडवेल ? हे वास्तव चिंताजनक आहे.  स्वतःचे छायाचित्र ‘स्टेटस’वर ठेवण्याची फॅशनच झाली आहे. ‘तुझ्या स्टेटसला जास्त ‘लाईक’ मिळतात कि माझ्या’, अशा स्वरूपाची चढाओढही दिसून येते. यामध्ये शिक्षक आणि प्राध्यापकही सामील आहेत, हे दुर्दैवी आहे; कारण शिक्षकांवर भावी पिढी घडवण्याचे दायित्व आहे. स्वतःचे छायाचित्र पोस्ट करण्याच्या कृती करून स्वतःच्या दायित्वाचे भान विसरणारे शिक्षक असणे, हे अधिक चिंताजनक आहे.

विद्यार्थ्यांना दिशाहीन करणारे शिक्षक !

‘विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करून घ्यायची कि आपल्या सौंदर्याची भुरळ पाडून त्यांना दिशाहीन करायचे ?’, याचा शिक्षक आणि प्राध्यापक यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. सामाजिक संकेतस्थळांच्या अतीवापरामुळे आजची तरुणाई भरकटत जाऊन त्यांची अधोगती होतच आहे; पण त्यांच्या दिशाहीनतेला वेसण घालू न शकणारे शिक्षक किंवा प्राध्यापक निर्माण होणे, हे त्याहून गंभीर आहे. अशा प्रकारे काही शिक्षक किंवा प्राध्यापक तरुणाईला शिक्षण सोडून फॅशनच्या मार्गावर नेत असतील, तर अशा शिक्षकांवर महाविद्यालयाचा अंकुश असणे आवश्यक आहे. अन्यथा ज्या वयात मुलांनी घडायचे आहे, त्याच वयात शिक्षकांमुळे विद्यार्थी भरकटले जात आहेत, असे चित्र निर्माण होईल. प्रत्येक शिक्षक हा देशाची भावी पिढी आदर्श घडवणाराच असायला हवा. हिंदु राष्ट्रात विद्यार्थ्यांना आदर्श घडवणारेच शिक्षक असतील हे नक्की !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.