हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १०० टक्के श्री गणेशमूर्ती विसर्जन !

प्रबोधनानंतर धर्मशास्त्राचे पालन करून मूर्ती विसर्जन करणारे खरे श्री गणेशभक्त ! – संपादक

कोल्हापूर, १५ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन व्हावे, यांसाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून मूर्ती विसर्जन प्रबोधन मोहीम राबवत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेली २ वर्षे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर जाऊन प्रबोधन करण्यास मर्यादा येत असली, तरी अनेक वर्षे झालेल्या प्रबोधनामुळे बहुतांश गावांमध्ये १०० टक्के श्री गणेशमूर्ती विसर्जन झाल्याचे पहावयास मिळाले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनास ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले होते, तसेच सामाजिक माध्यमांद्वारेही व्यापक प्रबोधन करण्यात आले होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. करवीर तालुक्यातील केर्ली येथे १०० टक्के मूर्ती विसर्जन झाले. येथे ‘रोटरी क्लब’, दोन स्थानिक महाविद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान करण्याचा उपक्रम राबवला जातो. यंदाही प्रारंभी १० श्री गणेशमूर्ती दान घेतल्या गेल्या. ही गोष्ट धर्मप्रेमी श्री. संजय माने यांना समजल्यावर त्यांनी ग्रामपंचायत सदस्य श्री. दीपक पाटील यांच्याशी चर्चा केली. ‘मूर्तीदान घेतल्याने श्री गणेशाची विटंबना होते आणि हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्या जातात’, असे श्री. माने यांनी सांगितले. यावर श्री. दीपक पाटील यांनी ‘मूर्ती परत वहात्या पाण्यात विसर्जित करतो’, असे सांगितले. यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी आणि श्री. दीपक पाटील यांनी या मूर्ती परत विसर्जित केल्या. या उपक्रमात धर्मप्रेमी श्री. तानाजी पाटील आणि श्री. राजाराम माने यांचा सहभाग होता. (शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित होण्यासाठी पुढाकार घेणार्‍या सर्वच धर्मप्रेमींचे अभिनंदन ! असे जागृत धर्मप्रेमी हेच हिंदु धर्मासाठी आशास्थान आहेत ! – संपादक)

२. मलकापूर येथे नगर परिषदेने हिंदु जनजागृती समितीस आश्वासन दिल्याप्रमाणे कुणावरही दान देण्यासाठी सक्ती केली नाही. येथे केवळ ३ श्री गणेशमूर्ती दान झाल्या होत्या. ही गोष्ट समितीचे कार्यकर्ते वैद्य संजय गांधी यांना समजल्यावर त्यांनी या संदर्भात मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, तसेच नगरसेवक यांना दूरभाष करून ‘हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करत या मूर्तीही विसर्जित कराव्यात’, असे आवाहन केले. विसर्जनस्थळी समितीचे सर्वश्री प्रसाद कुलकर्णी, सुधाकर मिरजकर, विश्वास पाटील, आशिष कोळवणकर, अनंत ढोणे रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.

३. पुलाची शिरोली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्री. शशिकांत खवरे आणि उपसरपंच श्री. सुरेश यादव यांनी मूर्ती विसर्जनासाठी बिरदेव तलावात विशेष सोय केली होती. शिरोली गावातील १५० गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या सर्व मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने लाकडाचा तराफा सिद्ध करून देण्यात आला होता आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही मूर्ती विसर्जनास साहाय्य केले. (भाविक आणि श्री गणेशोत्सव मंडळ यांना विसर्जनासाठी बिरदेव तलावात विशेष सोय करून देणार्‍या सरपंच शशिकांत खवरे आणि उपसरपंच सुरेश यादव यांचे अभिनंदन ! प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्यांचा आदर्श घेऊन असा पुढाकार घेणे अपेक्षित आहे ! – संपादक)

पुलाची शिरोली येथे विसर्जनासाठी तराफ्यासह उपस्थित उपसरपंच श्री. सुरेश यादव आणि अन्य

४. उंचगाव येथे ९० टक्के मूर्ती विसर्जन झाले. मूर्ती विसर्जन करण्यास ग्रामपंचायतीने भाविकांना चांगले सहकार्य केले. यात गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी क्रेनची व्यवस्था केली, तसेच विद्युत् व्यवस्थाही केली होती. या मूर्ती  ‘पॉलिटेक्निक’ जवळील तलावात विसर्जित करण्यात आल्या.

५. शिये येथील भाविकांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जन केले.