स्विस बँक काळा पैसा असणार्‍या भारतीय खातेदारांची सूची तिसर्‍यांदा भारताला देणार

यापूर्वी देण्यात आलेल्या सूचीतून विशेष काही निष्पन्न झाले नव्हते. आताही तसेच होईल, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक

बर्न (स्वित्झर्लंड) – स्विस बँकेकडून या मासामध्ये भारताला काळा पैसा असणार्‍या भारतीय खातेधारकांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन’च्या अंतर्गत स्विस बँकेकडून भारताला सप्टेंबर २०१९ मध्ये पहिली आणि सप्टेंबरमध्ये २०२० मध्ये दुसरी सूची मिळाली होती. ‘ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ म्हणजे भारताने विनंती न करताही एका विशिष्ट कालावधीने स्वित्झर्लंडच्या बँकांनी तेथील भारतीय खातेधारकांची सर्व माहिती भारताला पुरवण्याची प्रक्रिया होय. भारताला आता तिसर्‍यांदा ही माहिती मिळणार असून त्यात प्रथमच स्वित्झर्लंडमधील भारतियांच्या मालमत्तेच्या स्थावर मालमत्तेची माहितीही दिली जाणार आहे. डिजिटल चलनाचा तपशील देण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

१. स्विस बँकेच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात सांगितले की, या सूचीमध्ये महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये स्वित्झर्लंडमध्ये भारतियांच्या किती सदनिका आणि अपार्टमेंट आहेत ? अशा संपत्तीवर किती कर भरायचा आहे ? याची माहितीही असेल.

२. स्वित्झर्लंड सरकारने याच वर्षी परदेशी गुंतवणुकीची माहिती उघड करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या २ वर्षांमध्ये प्रत्येक वेळी स्वित्झर्लंडने जवळपास ३० लाख खातेधारकांची माहिती उघड केली आहे.