भोजनातील हानीकारक संयोग

१. दुधासह दही, मीठ, आंबट वस्तू, खारट, तेलकट, तिखट पदार्थ खाल्ल्याने अनेक रोग होतात. तसेच दुधासह चिंच, डांगर, मुळा, मुळ्याची पाने, बेल, दोडका, आंबट फळे, फणस, सातू, तळलेले पदार्थ खाणे हानीकारक आहे. दुधात गुळ टाकून सेवन करू नये. दुधासह सहसा अन्य पदार्थ खाऊ नये.

२. तुपासह थंड दूध, थंड पाणी आणि मद्य हानीकारक असते. वनस्पती तुपात किंवा त्या तुपापासून बनवलेल्या पदार्थासह लोणकढे तूप आणि साखर असलेले पदार्थ खाऊ नये.

३. दह्यासह केळ, डांगर, खरबूज, तसेच मुळा खाऊ नये. दह्याबरोबर खीर, दूध, पनीर आणि गरम जेवण घेऊ नये.

४. तेलयुक्त पदार्थासह मध किंवा साखर टाकलेले पदार्थ खाऊ नये, तसेच तेल किंवा तेलकट पदार्थासह तूप आणि साखर टाकलेले पदार्थ खाऊ नये. याचसमवेत मोहरीच्या तेलयुक्त पदार्थाबरोबर गाजर आणि दही खाऊ नये.

५. कोणत्याही प्रकारच्या मांसाहारी पदार्थाबरोबर मूग, गुळ, कमळाचे फळ, उडीद, मध, दूध आणि हरडे यांपैकी कोणताही पदार्थ खाऊ नये. मांसाहारी पदार्थाबरोबर मध किंवा पनीर घेतल्याने पोट बिघडते.

६. माशासह दूध, दुग्धजन्य पदार्थ, ऊसाचा रस आणि मध खाऊ नये.

७. मधाबरोबर मुळा, खरबूज, तूप, द्राक्षे, गरम पाणी आणि पावसाचे पाणी हानीकारक असते.

८. नारळाचे पाणी आणि कापूर एकत्र सेवन करू नये.

९. थंड पाण्याबरोबर शेंगदाणे, खरबूज, पेरू, जांभूळ, काकडी, तूप, तेल, गरम दूध, किंवा गरम भोजन घेऊ नये.

१०. चहाबरोबर थंड फळे, काकडी आणि थंड पाणी पिऊ नये.

११. खिरीसह खिचडी, आंबट पदार्थ, फणस आणि सातू खाऊ नये.

१२. गरम जेवणाबरोबर थंड पेये हानीकारक असतात.

१३. कुळीथबरोबर राई धान्याचा पदार्थ खाऊ नये.

१४. उडीदाच्या पदार्थाबरोबर दही, दूध, कैरी, चिंच, गूळ आणि ताक खाऊ अथवा पिऊ नये.

१५. फणस खाल्ल्यानंतर विड्याचे पान खाणे हानीकारक असते.

१६. कलिंगडाबरोबर पुदिना किंवा थंड पाणी घेऊ नये.

१७. खरबुजाबरोबर लसूण, मुळा, मुळ्याची पाने, दही आणि दूध खाणे हानीकारक असते.

१८. लेंडी पिंपळी, गूळ, कवठ आणि मध यांपैकी कोणतेही पदार्थ एकत्र खाणे अपायकारक आहे.

– वैद्य दत्तकुमार पाठक, नाशिक

(संदर्भ : संकेतस्थळ)