रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – या काळात प्रत्येक जण कधी ना कधी रेल्वेने प्रवास करत असतो. या प्रवासात स्वतःची प्रकृती कधी बिघडेल, हे कुणीही सांगू शकत नाही. आपण प्रवास करत असतांना अचानक आपल्याला किंवा सहप्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला, तर लगेच रेल्वेतून उतरून आधुनिक वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) जाणे शक्य नसते. अशा वेळी आपण रेल्वेमध्ये आधुनिक वैद्यांना बोलावण्याची सुविधा भारतीय रेल्वे देते. रेल्वेतून प्रवास करतांना आपल्याला रेल्वेकडून दिल्या जाणार्‍या सुविधा ठाऊक नसतात. रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

१. सर्वप्रथम आपल्याला तिकिट तपासनिसाला संपर्क साधावा लागेल. प्रत्येक रेल्वेस्थानकावर आधीच आधुनिक वैद्यांची व्यवस्था नसते. आपत्कालीन परिस्थितीप्रमाणे आधुनिक वैद्याची व्यवस्था केली जाते. त्यानंतर आधुनिक वैद्य रेल्वेमध्ये येऊन रुग्णाची तपासणी करतात आणि प्रकृती अधिकच बिघडलेली असल्यास जवळच्या रुग्णालयात रुग्णाला भरती केले जाते. त्यामुळे प्रवासाच्या वेळी कोणताही त्रास होत असल्यास त्वरित कोणत्याही रेल्वे कर्मचार्‍यांशी संपर्क साधावा.

२. प्रत्येक रेल्वेगाडीमध्ये प्रथमोपचार पेटी असते. त्या पेटीचा वापर करून तातडीचे उपचार दिले जाऊ शकतात. प्रवाशांमध्ये आधुनिक वैद्य कोण आहे, त्याची माहिती तिकिट तपासनिसाकडे असते. याखेरीज कुणाला तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्यास ‘रेल्वेमध्ये कुणी आधुनिक वैद्य प्रवास करत आहेत का ?’, हे विचारण्यासाठी उद्घोषणाही केली जाते.