१. आतिथ्यशील केसरकर दांपत्य !
१ अ. कुडाळ येथे गेल्यावर अधिवक्ता केसरकरकाकांनी त्यांच्या घरी साधकाची निवासव्यवस्था करणे : ‘वर्ष २००० मध्ये मी ठाणे येथील सेवाकेंद्रातून अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यासह न्यायालयीन सेवा करण्यासाठी कुडाळ येथे गेलो. कुडाळ येथील सेवाकेंद्रात पोचल्यावर मला समजले, ‘मी सेवाकेंद्रात रहायला येणार आहे’, हा निरोप तेथे मिळाला नव्हता.’ तेव्हा ‘माझ्या निवासाची व्यवस्था व्हायला वेळ लागू शकतो’, हे लक्षात घेऊन केसरकरकाकांनी लगेचच मला त्यांच्या घरी नेले. तेथे त्यांनी माझी सगळी व्यवस्था केली आणि मला सेवाही समजावून सांगितली. मी तेथे नवीन असूनही मला परकेपणा जाणवला नाही.
१ आ. केसरकरकाकू मला गरम जेवण वाढत असत.
१ इ. साधकाचा सर्वतोपरी विचार करून त्याची काळजी घेणारे केसरकरकाका ! : त्यानंतर २ – ३ दिवसांनी माझे कुडाळ सेवाकेंद्रात रहाण्याचे नियोजन झाले. तेव्हा काकांनी त्यांच्या घरातील मऊ गालीचा मला झोपायला दिला. ‘मला खर्चासाठी काही पैसे लागू शकतात’, हे लक्षात घेऊन काकांनी मला पैसेही दिले. मला कुडाळ सेवाकेंद्रातून त्यांच्या घरी जायला-यायला त्रास व्हायला नको; म्हणून काकांनी त्यांची दुचाकी गाडी मला वापरायला दिली. त्या गाडीत पेट्रोलही तेच भरून देत असत.
२. प्रेमभाव आणि श्री गुरूंवर दृढ श्रद्धा असलेले केसरकरकाका !
२ अ. प्रेमभाव
२ अ १. काकांनी साधकाच्या हातून त्यांच्या मुलींना चॉकलेट द्यायला लावून मुलींशी जवळीक साधायला शिकवणे : ‘साधकांशी जवळीक कशी वाढवायची ?’, हे केसरकरकाकांनीच मला शिकवले. त्या वेळी त्यांच्या मुली लहान होत्या. काकांनी मला ‘त्यांना कुठले चॉकलेट
आवडते ? कुठले विषय आवडतात ?’ हे सांगितले. त्यांनी स्वतःच त्यांना आवडणारे चॉकलेट आणले आणि मला मुलींना द्यायला सांगितले. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलींशी माझी लगेच जवळीक झाली. ‘प्रेमभाव कसा वाढवायचा ?’, हे मला काकांकडून शिकायला मिळाले.
२ अ २. घरी आलेल्या व्यक्तीला खाऊ देऊनच पाठवणे : काका-काकूंच्या प्रेमभावाचे आणखी एक उदाहरण म्हणजे ते त्यांच्या घरी गेल्यावर काहीतरी खाऊ दिल्याविना कधीही जाऊ देत नसत. त्यांच्या घरात जामचे (‘जाम’ नावाचे फळ) झाड होते. काकू मला झाडावरचे जाम काढून ठेवायला सांगत. अजूनही काका कुठे बाहेर गेले, तरी माझ्यासाठी आठवणीने खाऊ आणतात.
२ आ. केसरकरकाकांना साधकांविषयी नितांत प्रेम आणि आदर असणे : काका तेव्हा पुष्कळ तापट होते; परंतु ते विनाकारण कुणावर चिडत नसत. एखाद्याकडून चूक झाल्यास किंवा तत्कालीन परिस्थिती स्वीकारता न आल्यास ते चिडायचे. ते स्वतः चाणाक्ष असल्याने त्यांची इतरांकडूनही तशी अपेक्षा असायची. असे असले, तरी त्यांच्या मनात साधकांप्रती नितांत प्रेम आणि आदर होता. राग व्यक्त झाल्यावर त्यांना त्याची जाणीव होत असे आणि नंतर ते संबंधित साधकांशी स्वतःहून बोलत असत.
२ इ. केसरकर काकांमधील ‘स्वच्छता आणि नीटनेटकेपणा’ या गुणांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक !
२ इ १. कार्यालय अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे : काकांना सर्व गोष्टी अगदी नीटनेटक्या लागतात. ते स्वच्छतेचे पुष्कळ भोक्ते आहेत. त्यांना त्यांच्या पटलावर थोडीही धूळ किंवा डाग चालायचा नाही. तेव्हा त्यांच्या विधी (कायदा) विभागाच्या कार्यालयाच्या देखभालीची सेवा माझ्याकडे होती. ते प्रतिदिन मला कार्यालय स्वच्छ ठेवायला सांगायचे. मला त्याचा कंटाळा येत असे; परंतु त्यामुळे मलाही स्वच्छतेची गोडी लागली.
२ इ २. कुडाळ सेवाकेंद्रात आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी केसरकरकाकांच्या कार्यालयातच पूर्णवेळ थांबून त्यांच्यातील ‘टापटीपपणा’, या गुणाला दिलेली पोचपावती ! : एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले मुंबईहून गोवा येथे जातांना वाटेत कुडाळ सेवाकेंद्रात थांबणार होते. त्यामुळे सर्व साधकांनी लगबगीने सर्व सेवाकेंद्र स्वच्छ केले. परात्पर गुरु डॉक्टरांना विश्रांती घेण्यासाठी संतकक्ष सिद्ध केला. अनुमाने दुपारी ३ वाजता परात्पर गुरु डॉक्टर सेवाकेंद्रात आले आणि थेट विधी विभागात (केसरकरकाकांच्या कार्यालयात) गेले. केसरकरकाकांच्या आसंदीवर बसून ते मला म्हणाले, ‘‘हे आपल्या संस्थेतील सर्वांत ‘पॉश ऑफीस’ (स्वच्छ आणि नीटनेटके कार्यालय) आहे !’’ ते सेवाकेंद्रात असेपर्यंत पूर्णवेळ तिथेच बसले होते. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या संतकक्षात ते गेलेही नाहीत. ही गुरुदेवांनी काकांच्या टापटीपपणाला दिलेली पोचपावतीच होती.
२ ई. श्री गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर केसरकरकाकांनी न्यायालयात एकाच वेळी ९ अधिवक्त्यांचा प्रतिवाद करणे : वर्ष २००१ मध्ये हुसेन दलवाई यांच्या विरोधात सनातन संस्थेने केलेला मानहानीचा दावा आणि फौजदारी खटला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयात चालू होता. तेव्हा संस्थेचे वकीलपत्र काकांकडे होते. या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हुसेन दलवाई आणि अन्य वृत्तपत्रे यांचे एकूण ९ अधिवक्ते उपस्थित असायचे. ते एकाच वेळी गोंधळ करून काकांवर दबाव आणू पहायचे; परंतु श्री गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर काका एकटेच त्या सर्व अधिवक्त्यांचा प्रतिवाद करायचे. त्या वेळी त्यांची स्थिरता थोडीही न्यून होत नसे.
२ उ. केसरकरकाकांची अन्य अधिवक्त्यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
२ उ १. केसरकरकाकांच्या कार्यशैलीमुळे सरकारी अधिवक्ताही प्रभावित होणे : एका साधकाच्या अपघाताच्या खटल्यात सरकारी अधिवक्ताही काकांची कार्यशैली पाहून प्रभावित झाले होते. ते ‘सरकारी अधिवक्ता’ म्हणून काकांच्या विरोधात तेथे वकिली करत असले, तरी वैयक्तिक भेटीत त्यांनी माझ्याजवळ ‘काकांमुळे मी पुष्कळ प्रभावित झालो आहे’, अशी स्वीकृती (कबुली) दिली होती.
२ उ २. न्यायालयात काकांच्या युक्तीवादाच्या वेळी शिकण्यासाठी अनेक अधिवक्त्यांनी गर्दी करणे : एक अधिवक्ता म्हणून काकांचा युक्तीवाद इतका अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असायचा की, त्या न्यायालयातील कनिष्ठच नव्हे, तर ज्येष्ठ अधिवक्तेही सुनावणीच्या वेळी शिकण्यासाठी तेथे येऊन बसायचे.
२ उ ३. केसरकरकाकांच्या अभ्यासपूर्ण कामाचा ज्येष्ठ अधिवक्त्यांनी गौरव करणे : काकांच्या वकिलीच्या सेवेची पावती तेथील एका ज्येष्ठ अधिवक्त्यांनी दिली होती. ते काकांना म्हणाले होते, ‘‘अन्य अधिवक्ते पैसा कमावण्याचा व्यवसाय म्हणून वकिली करतात; पण खरा व्यवसाय तुम्ही करता ! मी तुम्हाला ‘खरा अधिवक्ता’ मानतो.’’
२ ऊ. वकिली व्यवसायात असतांना दिवाणी प्रकरणे हाताळूनही संस्थेच्या फौजदारी प्रकरणांत प्रभावीपणे बाजू मांडणे : वास्तविक काकांनी वकिली व्यवसाय करतांना दिवाणी न्यायालयातील अधिकोषांशी संबंधित प्रकरणे हाताळत वकिली केली; परंतु काळाची आवश्यकता म्हणून त्यांनी सनातन संस्थेत सेवा म्हणून फौजदारी वकिली केली. तेव्हा त्यांना पाहून ‘या प्रकारची सेवा ते फार वर्षांनी करत आहेत’, असे वाटत नव्हते, इतक्या प्रभावीपणे ते सनातन संस्थेची बाजू मांडायचे.
२ ए. धर्माभिमानी आणि निडर स्वभावाचे अधिवक्ता केसरकरकाका ! : मिरज येथील एका खटल्यात तेथील स्थानिक हितचिंतक अधिवक्त्यांनी काकांची तक्रारदार धर्मांध वकिलांशी ओळख करून दिली. तेव्हा त्या वकिलांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करताच काकांनी त्यांना नमस्कार केला आणि ‘आमची संस्कृती असे शिकवते’, हेही ठासून सांगितले. वास्तविक त्या वेळी मिरज येथील वातावरण इतके तापले होते की, प्रसंगी धर्मांधांमुळे जिवाला धोकाही निर्माण होऊ शकत होता. अशा वेळीही काकांनी त्या अधिवक्त्यांना दिलेले उत्तर त्यांचा धर्माभिमान दर्शवून गेले.
२ ऐ. केसरकरकाकांच्या ध्यानीमनी रुजलेली साधना
२ ऐ १. स्वभावदोष निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आल्यावर कसोशीने प्रयत्न करतांना आपल्या कनिष्ठ सहकार्याकडून (साधकाकडून) सर्व जाणून घेणारे केसरकरकाका ! : काकांना आरंभी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसंबंधी फारसे ठाऊक नव्हते. ते दिवस-रात्र नामजप करायचे; परंतु ते स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया राबवत नसत. त्यांना त्या प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आल्यावर त्यांनी त्यासाठी कसोशीने प्रयत्न चालू केले. वास्तविक पहाता ‘आपल्या कनिष्ठ सहकार्याला आपले स्वभावदोष विचारणे आणि त्याच्याकडून या प्रक्रियेविषयी जाणून घेणे’, हे कुठल्याही ज्येष्ठ अधिवक्त्यासाठी कठीणच; परंतु मी त्यांच्यापेक्षा वयाने पुष्कळ लहान असूनही त्यांनी मला त्यांचे स्वभावदोष विचारले आणि त्यावर ‘स्वयंसूचना कशी सिद्ध करायची ? ती कशी घ्यायची ?’, अशा सर्व बारीक बारीक गोष्टीही विचारल्या. मी त्यांना जे काही सांगेन, ते विनाविकल्प स्वीकारून ते त्वरित कृतीत आणायचे.
२ ऐ २. कुठल्याही अधिवक्त्याला संपर्क केल्यावर त्याच्याशी व्यवहाराविषयी विशेष न बोलता साधनेविषयी अधिक बोलणे : सर्वसाधारणतः प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायातील कुणी समोर आले की, व्यवसायासंबंधी बोलायला आरंभ करते; मात्र काका याला अपवाद आहेत. काकांनी आतापर्यंत अनेक अधिवक्त्यांना संपर्क केला आणि आजही ते त्या अधिवक्त्यांशी संपर्क ठेवून आहेत; परंतु काकांचे त्यांच्याशी बोलणे साधनेविषयीचे असते. ते प्रत्येक अधिवक्त्याला नामजपाचे महत्त्व सांगतात आणि ‘ते अधिवक्ता नामजप करतात कि नाही ?’, याचा पाठपुरावा घेतात. ते त्या अधिवक्त्यांच्या नामजप करण्यात येणार्या अडचणीही सोडवतात. ते त्यांच्याशी व्यवसायासंबंधी फारतर २० ते २५ टक्केच बोलतात अन् तेही कार्याच्याच अनुषंगाने !
३. उतारवयातही शिकण्याची वृत्ती असलेल्या सौ. केसरकरकाकू !
३ अ. निवृत्तीनंतर मराठी व्याकरण आणि वार्ता अन् लेख यांचे संकलन शिकणे : सौ. केसरकरकाकूंनी टपाल खात्यातून निवृत्ती घेतली. त्यानंतर आरंभी त्यांच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वार्तांकन करण्याची सेवा होती. त्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर मराठी व्याकरणाचा अभ्यास केला. त्यांची त्याही वयात शिकण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी होती आणि आजही ती टिकून आहे. त्या न्यायालयीन वार्तांचे संकलन करायच्या. त्या तत्कालीन विषयांवर विविध लेखही लिहायच्या. काकूंचे वागणे धीरगंभीर असे आणि त्यांना पुढे पुढे करायला आवडत नसे.
असे कितीतरी प्रसंग आहेत की, ज्यातून मला केसरकरकाका आणि काकू यांच्यातील अनेक गुण शिकायला मिळाले; परंतु विस्तारभयास्तव काही ठळक प्रसंगच येथे लिहिले आहेत. ‘अशा केसरकर दांपत्याचा सत्संग मला दिला’, यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.७.२०२१)