कृत्रिम हौदात विसर्जन आणि मूर्तीदान करतांना गर्दी होत नाही का ? – संपादक
कोल्हापूर, १० सप्टेंबर – प्रशासनाने अनेक जिल्ह्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आवाहन केले आहे. यासह काही ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणले आहेत, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन केले आहे. केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद आणि मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ? गर्दी तेथेही होणारच आहे, तर केवळ वहात्या पाण्यातील विसर्जनावर निर्बंध का ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला. कोरोना महामारीच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.
श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यावर निर्बंध आणल्याने गणेशभक्तांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. गणेशभक्तांना कोणतीही सक्ती न करता श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करू द्यावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर येथे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी शिवसेनेचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’चे सदस्य श्री. प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. नितेश कुलकर्णी उपस्थित होते.
पुणे येथे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘शिवसमर्थ कोकण ट्रस्ट’चे श्री. गणेश पवार आणि ‘श्रीगौड ब्राह्मण समाजा’चे श्री. मनोहर उणेचा उपस्थित होते.
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळायला हवी, असे आवाहन वारंवार सरकारने केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आणले आहेत; मात्र वैयक्तिक धर्माचरणाशी संबंधित कृतींवर बंधने आणणे योग्य नाही. वैयक्तिक धर्माचरण करणे, हे भारतीय घटनेच्या कलम २५ नुसार दिलेला ‘धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार’ आहे. हा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
२. ‘हिंदु समाज सहिष्णू आहे. धर्मपरायण आहे; म्हणून हिंदूंच्या धर्माचरणावर निर्बंध आणले तरी चालतील’, या भ्रमात सरकारने राहू नये. राज्यातील विविध पक्षांच्या सभा, तसेच कार्यक्रम यांसाठी झालेली गर्दी चालते; बाजार आणि ‘मॉल’ (दैनंदिन जीवनात लागणार्या सर्व वस्तू एके ठिकाणी मिळण्याचे ठिकाण) मध्ये झालेली गर्दी चालते; मद्याच्या दुकानांबाहेर लागलेल्या रांगा चालतात; मात्र केवळ श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्या पाण्यात केलेले चालत नाही, हा हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर गदा आणण्याचाच प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करतो.
३. कोरोना महामारीच्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून नागरिकांना वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. जर कृत्रिम हौद आणि मूर्तीदान या मोहिमा सरकार राबवत असेल आणि वहात्या पाण्यातील विसर्जनावर बंदी आणणार असेल, तर आम्ही त्याला कडाडून विरोध करू.