कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करावेत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही धोक्याची चेतावणी आहे. हे सर्वांनी गांभीर्याने घेतले नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे राज्यातील नागरिकांना केले आहे.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. अन्य कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता; मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही. जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण सिद्ध रहाण्याची स्पष्ट सूचना आहेच; पण सत्ताधारी आणि विरोधी सर्वांनीच आता अधिक काळजी घ्यावी. गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. सण-उत्सव आले आहेत. त्यावर निर्बंध लावावेत, असे कुणाला वाटेल ? पण शेवटी आपले आरोग्य आणि प्राण महत्त्वाचे आहेत. उत्सव नंतरही साजरे करू.’’